रस्त्यावरील मुलं ठरतायेत व्यसनांचे बळी
- सुंगधी पान, सुपारी, गुटखा सदृश्य गोष्टींचे आकर्षण
पुणे – रत्यावर सिग्नलला थांबल्यावर बऱ्याचदा तंबाखू, पान, गुटखा खाणारी मुलं पहायला मिळतात. यामधील काही मुलांचे पालकच व्यसनाधीन असल्यामुळे त्यांनाही या सवयी लागतात. शालाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणून शिक्षण देणे हा जसा त्यांचा मुलभूत हक्क आहे तसेच त्यांना निरोगी वातावरण निर्माण करणे हे देखील त्यांची मुलभूत गरज आहे, मात्र सध्या त्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होताना दिसत आहे.
रत्यावर, स्टेशनवर पोलिसांमार्फत किंवा अन्य संस्थांमार्फत जी मुले पकडली जातात त्यातील काही मुले ही व्यवनाधीन असतात. ही मुलं सुगंधी पान मसाला, सुपारी, गुटखा अशा गोष्टी उत्सूकता म्हणून खातात. काहींना त्याची सवयही लागते. ही मुले बारा वर्षांपुढील असतात. मात्र बालसुधारगृहात आल्यानंतर त्यांचे समुपदेशन होते व त्यांना अशा सर्व व्यवसनांपासून दूर ठेवले जाते. त्यामुळे त्यांची ती सवय सुटते.
– अनिता विपत, अध्यक्ष, बाल कल्याण समिती
गेल्या काही वर्षांत शालाबाह्य विद्यार्थी याचा मोठा गाजावाजा झाला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे सांगत प्रत्येकाने शालाबाह्य मूल शोधून शाळेत आणावे असेही प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून झाले आहेत. मात्र या मुलांना केवळ शाळेत आणणे एवढेच काम पुरेसे नाही तर त्यांना असलेल्या व्यवसनांपासून त्यांची सुटका करणे, त्यांचे हे व्यसन अन्य विद्यार्थ्यांमध्ये पसरु न देणे आदी गोष्टींबाबतही शासनाने गंभीर पाऊले उचलणे गरजेचे आहे.
सिग्नलवर, नदीकिनारी, स्टेशनवर, बसस्थानकांवर अनेक ठिकाणी हल्ली मोठ्यापेक्षा लहान मुलांचे प्रमाण सध्या अधिक दिसते आहे. यातील बऱ्याचश्या मुलांकडून आपल्या व्यसनाचे चोचले पुरवून घेण्यासाठी त्यांचे पालकच त्यांच्याकडून भीक मागवून घेतात. त्याबरोबर रत्यावर येणारे जाणारे ज्या पध्दतीने गुटखा, पान खाऊन थुंकतात तशाच प्रकारचे व्यसन ही लहानगी पाच ते सहा वर्षांपासूनची मुलं करू पाहतात. अनेकांना याची सवयच लागते. जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त (31 मे) या वर्गाकडेही प्रकाश टाकण्याची नितांत गरज झाली आहे. केवळ शिक्षणच नाही तर चांगले आरोग्य हा देखील या मुलांचा हक्क आहे.