रत्नागिरीला ७५ कोटी, सिंधुदुर्गास २५ कोटी जाहीर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/cyclone-kyar.jpg)
मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहील असे सांगून तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीला ७५ कोटी रुपये व सिंधुदुर्गला २५ कोटी रुपये जाहीर केले. ठाणे व पालघर जिल्ह्यात तुलनेने कमी नुकसान झाले आहे मात्र तेथीलही आढावा घेतला जाऊन मग निर्णय घेतला जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.हे पॅकेज नसून तातडीची मदत आहे असेही ते म्हणाले.
अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाईचे जुने निकष बदलण्याची गरज असून नवे सुधारित निकष कसे असावेत त्याबाबत प्रशासनाने लवकरच माहिती सादर करावी म्हणजे निर्णय घेता येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचा आढावा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आणि लोकप्रतिनिधीच्या सुचना ऐकल्या व प्रशासनाला योग्य ते निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी सर्वाधिक फटका बसलेल्या रायगड जिल्ह्यास नुकतीच मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली होती.