येत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार
![Presence of rain with hail in Pune and Pimpri-Chinchwad area ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/rain.png)
बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात रविवारी पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात काही प्रमाणात कमी झालेला पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Capture-53.jpg)
दरम्यान, सध्या राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही प्रमाणात ढगाळ हवामान आहे. काही ठिकाणी ऊन पडत असले तरी सायंकाळी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. विदर्भात मात्र पावसाने दडी मारली आहे.
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, रविवारी तसेच सोमवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार तर मराठवाडा व विदर्भात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याने कोकणात जोरदार पश्चिमी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी वर्तवली आहे.