breaking-newsपुणेमहाराष्ट्र

मोसमी पाऊस राज्यात दाखल

तळ कोकणात मुसळधार पाऊस; तीन दिवसांत सर्व भागांत संचार

तब्बल दोन आठवडय़ाने उशिरा का होईना नैर्ऋत्य मोसमी वारे अखेर राज्यात पोहोचले आहेत. कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूपर्यंत दाखल झालेले हे आनंदघन सध्या तळ कोकणात मुसळधार बरसूही लागले आहेत.

मोसमी वाऱ्यांचा मार्ग यंदा विविध अडथळ्यांनी अडला होता. अंदमानात दाखल झाल्यानंतर साधारण वेळेनुसार ते १ जूनला केरळमध्ये दाखल होणे अपेक्षित असताना आठवडाभर उशिराने म्हणजेच ८ जूनला मोसमी वारे केरळमध्ये पोहोचले. त्यानंतर त्यांची चांगली प्रगती सुरू असताना अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘वायू’ चक्रीवादळाने त्यांची वाट रोखली. चक्रीवादळ तीव्र झाल्यानंतर बहुतांश बाष्प समुद्रात खेचले गेले. त्यामुळे मोसमी वाऱ्यांचे प्रवाह मंदावून ते केरळच्या आसपासच रेंगाळले. वादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर १४ जूनला पुन्हा वाटचाल सुरू होऊन मोसवी वारे कर्नाटक, तमिळनाडूत पोहोचले. मात्र, त्यांचा प्रवास काहीसा संथ होता. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा वेग वाढला होता. कर्नाटकची संपूर्ण किनारपट्टी, गोवा राज्य व्यापून मोसमी वाऱ्यांनी कोकणातील रत्नागिरी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूपर्यंत मजल मारली आहे. पूर्व भारतातील पश्चिम बंगालच्या आणखी काही भागांतही प्रगती करीत त्यांनी कोलकातापर्यंतचा टप्पा पूर्ण केला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यतील सावंतवाडी, कुडाळसह किनारपट्टी परिसरात सध्या मुसळधार पाऊस कोसळतो आहे.

पोषक स्थिती

मोसमी वाऱ्यांचे प्रवाह सध्या बळकट आहेत. त्याचप्रमाणे पुढील प्रवासासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांचा प्रवास वेगवान होण्याची शक्यता असून पुढील तीन ते चार दिवसांत मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण राज्य चिंब होणार आहे. त्यामुळे दुष्काळी भागांना दिलासा मिळू शकणार आहे. पुढील ४८ तासांत मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगावसह मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे. मुंबईत अतिवृष्टीची शक्यता आहे. २२ ते २७ जून दरम्यान जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button