मोनोरेल सेवा विस्कळीत; चेंबूरजवळ तांत्रिक बिघाड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/mono-rail.jpg)
सोमवारी सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरूवात झाली. रात्रीपासून पडणाऱ्या पावसाचा जोर सकाळी वाढला होता. गोरेगाव, मीरा रोड, लालबाग, परळ, या ठिकाणी असलेल्या सखल भागांमध्ये पाणी साठण्यास सुरूवात झाली असतानाच अंधेरी, वांद्रे परिसरातही जोरदार पाऊस पडतो आहे. सर्वत्र वाहतुकीचाही वेग मंदावला असताना मुंबईत मोनोरेल सेवा विस्कळीत झाल्याचा प्रकार घडला आहे.
सोमवारी पुन्हा एकदा मोनोरेल सेवा विस्कळीत झाली आहे. मोनोरेलच्या चेंबूर स्थानकाजवळ मोनोरेल अडकल्याचा प्रकार घडला. चेंबूर स्थानकाजवळ मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मोनोरेल सेवा बंद पडली असल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वीही अनेकदा मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा ठप्प झाल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या.
यापूर्वी आगीच्या घटनेनंतर मोनोरेलची सेवा तब्बल दहा महिने बंद ठेवण्यात आली होती. त्यातच ही सेवा सुरू झाल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी तांत्रिक दोषामुळे ही सेवा बंद पडली होती. दरम्यान, चेंबूर नाका स्थानकाजळच तांत्रिक बिघाड झाला होता. त्यानंतर दिवसभराच्या प्रयत्नानंतर ही सेवा पूर्ववत झाली होती. त्यातच आता पुन्हा एकदा चेंबूर स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सोमवारी सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली असतानाच मोनोरेलची सेवाही विस्कळीत झाली आहे. गेल्या आठवड्यात पावसाने मुंबईची दाणादाण उडवली होती. तसेच मध्य रेल्वेची सेवा १६ तास बंद झाली होती. शनिवारीही पावसामुळे मुंबईतल्या मुलुंड स्थानकात पावसामुळे ओव्हरहेड वायरवर झाड कोसळले होते. त्यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला होता. पावसाचा बेस्ट बस सेवेवर परिणाम झाला आहे. विक्रोळी ते कांजूरमार्ग दरम्यान रेल्वे रूळांवरही पाणी साठलं होतं जे आता ओसरण्यास झाली आहे.