मे महिन्यात ताफ्यात येणार आणखी 100 “ई-बस’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/e-bus-696x461.jpg)
बांधणी लवकरात लवकर करण्याचे आदेश : “बीआरटी’ मार्गावर धाऊ शकणाऱ्या बसेसची बांधणी
पुणे – पीएमपीएमएल “ई- बसेस’ला प्रवाशांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मिळता प्रतिसाद लक्षात घेऊन उर्वरीत शंभर बसेसची बांधणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाने संबंधित विभागाला दिले आहेत. त्यानुसार मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या बसेस ताफ्यात दाखल होणार आहेत.
पीएमपीएमएलच्या ताफ्यात सध्या मालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील अशा 2 हजार 375 बसेस आहेत. नव्याने आलेल्या 25 ई-बसेसमुळे या बसेसची संख्या 2 हजार 400 झाली आहे. मात्र, यातील पाचशेहून अधिक बसेस या जुन्या आणि पंधरा वर्षांपूर्वीच्या असल्याने त्या बाद कराव्या लागणार आहेत. त्यामुळे दोनशे ई-बसेस घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. गेल्या नोव्हेंबर महिन्यात त्याबाबतची प्रक्रिया झाली होती. त्यानुसार गेल्याच महिन्यात 25 बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेसमुळे प्रवाशांचा आरामदायी आणि सुखद प्रवास, इंधनाची बचत आणि कमी प्रदूषण असा तिहेरी फायदा होत असल्यानेच या बसच्या खरेदीसाठी प्राधान्य देण्यात आले आहे, असे स्पष्ट करून गुंडे म्हणाल्या, शंभर बसेसची बांधणी अंतिम टप्प्यात असून त्यांची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरीत 75 बस या टप्प्याटप्प्याने मार्गावर आणण्यात येणार आहेत. प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन या बसेसची लांबी तीन मीटरने वाढविण्यात आली असून नव्या बस या बारा मीटर लांबीच्या असणार आहेत. त्यामुळे आसनांची संख्या वाढणार आहे. शिवाय, या सर्व बसेस “बीआरटी’ असणार आहेत, असेही गुंडे यांनी स्पष्ट केले.
चार्जिंग स्टेशनही वाढविणार…!
यापूर्वी बसची संख्या कमी असल्याने भेकराईनगर आणि पिंपरी अशा दोन ठिकाणीच चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात आले होते. तरीही बसेसच्या तुलनेत हे स्टेशन कमी पडत आहेत. त्याशिवाय बसची संख्या आणखी शंभरने वाढल्यास ही स्टेशन खूपच कमी पडणार आहेत. त्यामुळे येत्या महिनाभरात या स्टेशनची संख्या वाढविण्यात येणार आहे. ही स्टेशन कोठे सुरू करता येतील यासंदर्भात संबंधित विभागाशी चर्चा करण्यात येणार आहे, असेही गुंडे यांनी स्पष्ट केले.