breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मेट्रो स्थानकांखाली वाहनांना प्रवेशबंदी

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय, बेस्ट, सायकलसाठी मार्गिका

शहरात उभारल्या जाणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या स्थानकांखाली ५० मीटपर्यंत एमएमआरडी खासगी वाहनांना प्रवेश बंदी करणार आहे. तसेच सायकल, बेस्ट बस आणि शक्य झाल्यास रिक्षांसाठी थांबे किंवा स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात येणार आहेत.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देण्याबरोबरीनेच खासगी वाहनांमुळे मेट्रो स्थानकांखाली होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या मुंबईतील विविध भागांमध्ये मेट्रो प्रकल्पांच्या कामांनी वेग पकडला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर पडणारा अतिरिक्त ताण लक्षात घेऊन एमएमआरडीएने शहरात मेट्रो मार्गिकांचे जाळे विणण्यास सुरुवात केली आहे. दहिसर (पू) ते डी.एन.नगर (मेट्रो २ ए ) आणि दहिसर (पू) ते अंधेरी (पू) (मेट्रो ७) या मेट्रो मार्गिकांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. नव्या वर्षांत यातील एक मार्गिका प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. मेट्रो मार्गिकांबरोबरीनेच मेट्रो स्थानकांचा विकासदेखील करण्यात येणार आहे. स्थानकांच्या निर्मितीनंतर हरित आणि संकल्पनाधारित मेट्रो स्थानकांसारख्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यातच शक्य असणाऱ्या मेट्रो स्थानकांखाली ५० मीटर अंतरापर्यंत खासगी वाहनांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय एमएमआरडीए प्रशासनाने घेतला आहे. भविष्यात खासगी वाहनांमुळे मेट्रो स्थानकांखाली निर्माण होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन, हा निर्णय घेण्यात आला आहे.

मेट्रो स्थानकांखाली ५० मीटर अंतरापर्यत खासगी वाहनांना बंदी घालून त्याऐवजी बेस्ट बस आणि शक्य झाल्यास रिक्षा-टॅक्सीसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात येणार आहे. शिवाय सायकलसाठी थांबे तयार करण्यात येतील. परिसरानुरूप मेट्रो स्थानकांचा विकास कशा पद्धतीने करावा यासाठी पुस्तिका तयार करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर.ए.राजीव यांनी दिली. शिवाय उन्नत स्थानकांमधून खाली उतरल्यावर इच्छित स्थळी जाणऱ्या प्रवासांच्या सोयीकरिता मेट्रो स्थानकांखाली मोठे पदपथ तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच फेरीवाल्यांना मेट्रो स्थानक परिसरांमधून दूर ठेवून खाद्य आणि शीतपेयांचा पुरवठा करणारी स्वयंचलित यंत्रे बसविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

मेट्रो स्थानकांखाली खासगी वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ शकते, हे लक्षात घेऊन स्थानकांखाली ५० मीटपर्यंत खासगी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. त्याऐवजी सायकल स्टॅण्ड, बेस्ट बस आणि शक्य झाल्यास रिक्षांसाठी स्वतंत्र मार्गिका उभारण्यात येणार आहेत.    – आर. ए. राजीव, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button