मुलाची हत्या करून महिलेची आत्महत्या
![Husband commits suicide after being harassed by his wife and father-in-law](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/suicide-1.jpg)
मुंबई : पतीशी झालेल्या भांडणाच्या रागातून आईने चार वर्षांच्या मुलाला गळफास लावून त्याची हत्या केल्यानंतर स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी कुर्ला येथे घडली. याबाबत व्ही.बी. नगर पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे.
अनुजा वंजारी (वय ३०) आणि श्री वंजारी (वय ४ ) अशी या मृतांची नावे असून ते कुर्ला बैल बाजार येथील शिंगरे चाळीत राहात होते. महिलेचा पती एका खासगी सुरक्षारक्षक कंपनीत नोकरीस होता. सहा वर्षांपूर्वी या दोघांचा विवाह झाला होता. मात्र काही दिवसांपासून पती-पत्नींमध्ये भांडणे सुरू होती. सोमवारीही या दोघांमध्ये वाद झाला होता. याच रागातून महिलेने मंगळवारी पती कामावर गेल्यानंतर पहिल्यांदा मुलाला गळफास लावून त्याची हत्या केली. त्यानंतर स्वत:लाही गळफास लावून आयुष्य संपवले.
बराच वेळ घरातील कुणीही बाहेर न आल्याने शेजाऱ्यांनी खिडकीतून पाहिले असता, हा प्रकार समोर आला. शेजाऱ्यांनी बिनोबा भावे नगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढले. बुधवारी राजावाडीत शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह महिलेच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आले. मात्र जोपर्यंत पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा महिलेच्या नातेवाईकांनी घेतला होता. अखेर पोलिसांनी समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. व्ही.बी. नगर पोलिसांनी पती दीपक वंजारी याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला मंगळवारी सायंकाळी अटक केली. तर बालिकेच्या हत्येप्रकरणी तिच्यावरही पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.