मुंबई पुन्हा गारठली, राज्यात सरींची शक्यता!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/cold-2-1.jpg)
मुंबई : कधी नव्हे ते थंडीचा आनंद घेत असताना शहरातील थंडी अचानक गायब झाल्याने हिरमुसलेले मुंबईकर गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा थंडीचा अनुभव घेत आहेत. पुढील दोन दिवस ही तापमान-घट कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
वायव्येकडून येणारे वारे जमिनीलगत वाहत येत असल्याने कमाल तापमानाची घसरगुंडी झाली आहे. यासोबतच उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे किमान तापमानाचा पाराही गुरूवारी सकाळी घसरल्याने शहरात पुन्हा गारवा जाणवत आहे.
जानेवारी महिना सुरू झाला तशी शहरातील थंडीने दडी मारली. गेल्या आठवडय़ात कमाल तापमानाने ३५ अंश.से.पर्यत उचल खाल्ली होती. वायव्येकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे बुधवारी कमाल तापमानाचा पारा जवळपास ३ अंश. से. ने घसरला. बुधवारी सांताक्रूझ येथे २७.२ अंश.से. कमाल तापमान नोंदले गेले, तर कुलाबा येथे ते २७ अंश. से. होते.
कमाल तापमानासह गुरूवारी किमान तापमानामध्येही घट झाली. गुरूवारी कुलाबा येथे किमान तापमानाची नोंद १७.६ अंश.से. झाली, सांताक्रूझ येथे ते १५ अंश.से. पर्यत खाली आले. वायव्येकडील वारे सध्या जमिनीलगत वाहत आहेत. परिणामी दुपारनंतर समुद्राकडून जमिनीकडे येणारे वारे लवकर स्थिरावल्याने बुधवारी कमाल तापमानात घट झाली आणि हवेत गारवा वाढला. तसेच उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे किमान तापमानात घट झाल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
गुरूवारीही कमाल तापमानाची घट कायम राहिली आहे. सांताक्रूझ येथे गुरूवारी २७.८ अंश.से कमाल तापमानाची नोंद झाली, तर कुलाबा येथे २७.६ एवढे कमाल तापमान नोंदले गेले.