breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबईत मुसळधार, तलावक्षेत्रात मात्र रिमझिम

पाणी चिंता कायम

मुंबई : मुंबईत गेल्या चार-पाच दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय झाली आणि दोन धरणाएवढय़ा पाण्याचा उपसा पंपांनी केला. परंतु, हा पाऊस प्रत्यक्षात जिथे पडायला पाहिजे त्या धरणक्षेत्रात मात्र रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांची अवस्था थेंबे थेंबे तळे साचे अशी झाली आहे. या पावसामुळे सातही धरणात मिळून १ लाख ६९ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झालेला असला तरी एकू ण क्षमतेच्या केवळ ११ टक्के पाणीसाठाच जमा झाला आहे.

संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जूनच्या अखेरीस पावसाने मुंबईत बरसायला सुरुवात केली पण पाच-सहा दिवसांत मुसळधार कोसळून मुंबईला अक्षरश: झोडपले. पाच-सहा दिवसांतच पावसाने जून महिन्याची कसर भरून काढली आहे. तलावक्षेत्रातही पावसाने हजेरी लावली असली तर शहरात जितका पाऊस पडला तितका पाऊस धरणक्षेत्रात मात्र पडलेला नाही. त्यामुळे पाऊस आला म्हणून सुटकेचा नि:श्वास सोडणाऱ्या मुंबईकरांची पाण्याची चिंता मात्र कायम आहे. मुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. ही गरज भागवण्यासाठी सातही तलावात मिळून १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. गेल्या वर्षी धरणे पूर्ण क्षमतेने न भरल्यामुळे नोव्हेंबर महिन्यातच १० टक्के पाणीकपात करावी लागली होती. त्यामुळे धरणातील पाणी कसेबसे जुलैपर्यंत पुरले आहे. आता या वर्षी तरी जलाशये पूर्ण भरतील का याकडे मुंबईकरांचे आणि पालिका प्रशासनाचेही लक्ष लागले आहे. उर्ध्व वैतरणा धरणातील पाणीसाठा ही वापरायोग्य पाणीसाठय़ाच्याही खाली गेला असून त्यात सर्वात कमी पाऊस पडला आहे.

धरणक्षेत्रात आतापर्यंत पडलेला पाऊस हा समाधानकारक आहे. अजून संपूर्ण पावसाळा शिल्लक आहे. त्या दरम्यान पाऊस पडेल आणि पाण्याची पातळी वाढेल, अशी अपेक्षा आहे. पालिकेची सगळी धरणे ही जंगलक्षेत्रात आहेत. धरणक्षेत्रात सुरुवातीला १५ दिवस पडणारा पाऊस हा आधी जमिनीत मुरतो. मात्र त्यानंतर पडणारा पाऊस हा झिरपत वाहत धरणात येत असतो. त्यामुळे एकदा पाऊस पडला की पुढचे पंधरा दिवस जमिनीत झिरपत येणारा व वाहत येणारा प्रवाह धरणात येऊन मिळतो व त्यामुळे पाण्याची पातळी वाढत असते, असे जलअभियंता अशोककुमार तवाडिया यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button