मिरजेत भाजप -राष्ट्रवादीच्या गटात तूफान राडा; ८ जण जखमी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/41669221_782213282170334_6611967487787401216_n.jpg)
मिरज – येथील बसवेश्वर चौक येथून गणेश आगमन मिरवणूक जात असताना भाजपाचे डॉ. महादेव कुरणे व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अभिजीत हारगे गटात तूफान हाणामारी झाली. या हाणामारीत काठी व दगडाने मारहाण करण्यात आली. यात कुरणे गटाचे ५ तर हारगे गटाचे ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे शहरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत कुरणे गटाच्या जयश्री कुरणे आणि हारगे गटाच्या संगीता हारगे यांच्यात चुरशीची निवडणुक झाली होती. यात संगीता हारगे या विजयी झाल्या होत्या. निवडणुक निकालानंतर गेल्या महिन्यापासुन कुरणे व हारगे गटात वेगवेगळ्या कारणावरून धूसपूस सुरू होती. आज (गुरुवार) बसवेश्वर चौक येथून गणेश आगमन मिरवणूक सुरू होती. यावेळी कुरणे व हारगे गटात संघर्ष होऊन तूफान हाणामारीचा झाली. यात दोन्ही गटाचे मिळून आठ जण गंभीर जखमी झाले. गणरायाच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी सांगलीत हा अनुचित प्रकार घडल्याने याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.