breaking-newsपुणेमहाराष्ट्र

माहिती या शस्त्राचा वापर सामाजिक कल्याणासाठी होणे गरजेचे

माहिती आयुक्त धारूरकर यांची अपेक्षा

लोकशाही व्यवस्थेमध्ये नागरिक मालक असतात ही भावना सामान्य नागरिकाला अनुभवण्याची संधी माहिती अधिकार कायदा देतो. या कायद्यातून मिळणारी माहिती ही शस्त्रासारखी असते, मात्र तिचा वापर समाजातील दु:ख, दैन्य दूर करण्यासाठी होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा औरंगाबाद खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांनी रविवारी व्यक्त केली.

सजग नागरिक मंचतर्फे दिला जाणारा ‘सजग नागरिक माहिती अधिकार पुरस्कार’ ‘इंडियन एक्सप्रेस’च्या मुंबईतील खास प्रतिनिधी विश्वास वाघमोडे यांना धारूरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. विवेक वेलणकर, जुगल राठी यांची प्रमुख उपस्थिती होती.

विश्वास वाघमोडे म्हणाले, राज्य माहिती आयुक्त दिलीप धारूरकर हे पूर्वाश्रमीचे पत्रकार असल्याने त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळणे हा माझा सन्मान आहे. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून विवेक वेलणकर यांच्याकडून माहिती अधिकार कायद्याशी तोंडओळख झाली. त्यानंतर पत्रकारितेतील पहिली बातमीदेखील माहिती अधिकार वापरून मिळाली. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, वस्त्रोद्योग विभाग, ऊर्जा, पर्यावरण यासह विविध विभागांतील माहिती उघडकीस आणण्यासाठी माहिती अधिकार उपयुक्त ठरला.

शासनाची भाषा आणि अधिकाऱ्यांची मानसिकता या बाबत आलेल्या अनुभवांनी पत्रकार म्हणून समृद्ध केले. सर्वसामान्य व्यक्तीचा आवाज बनण्याची क्षमता माहिती अधिकारामध्ये असल्याचा अनुभव घेतला आहे. माहिती अधिकार कायद्याचा वापर करत असताना माहिती मागणारी व्यक्ती आपल्याला त्रास देत असल्याची भावना अधिकाऱ्यांमध्ये दिसते. ती दूर करण्यासाठी त्यांच्या कलाने घेणे, संघर्षांची परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. माहिती अधिकारासाठी अर्ज करण्याबरोबरच अभिलेख तपासणीच्या सुविधेचाही उपयोग पत्रकारितेसाठी झाल्याचे वाघमोडे यांनी सांगितले.

धारूरकर म्हणाले, पत्रकारिता आणि माहितीचा अधिकार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. माहितीचा अधिकार वापरून त्याचा वापर समाजातील नकारात्मक चित्र बदलण्यासाठी करणाऱ्या विश्वास वाघमोडे यांचे काम अभिनंदनीय आहे. विवेक वेलणकर यांनी प्रास्ताविक केले. जुगल राठी यांनी पुरस्कारामागची कल्पना विशद केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button