breaking-newsपुणेमहाराष्ट्र

मानाच्या मंडळांचा दिमाख

ढोल-ताशांचे पारंपरिक वादन, ‘श्रीं’चा अखंड जयघोष, रांगोळ्यांच्या पायघडय़ा, मनोहारी गालिचे, विविधरंगी फुलांची आरास, या साऱ्याला गणेशभक्तांच्या उत्साहाची साथ रविवारी लाभली  आणि अशा उल्हसित वातावरणात निघालेली मानाच्या पाचही गणपतींची मिरवणूक यंदाही दिमाखदार  ठरली. पारंपरिक वाद्यवादन, ‘श्रीं’च्या दर्शनासाठी भक्तांची झालेली अलोट गर्दी, सामाजिक जागृती करणारी पथके, परदेशी नागरिकांचा सहभाग, हवाई दलाने केलेली पुष्पवृष्टी हे या विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्टय़ ठरले.

मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती. कसबा पेठ, तांबडी जोगेश्वरी, गुरूजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या आणि प्रमुख आकर्षण असणाऱ्या मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला रविवारी सकाळी साडेदहा प्रारंभ झाला. महात्मा फुले मंडई येथील लोकमान्यांच्या पुतळ्याजवळ मानाच्या पहिल्या कसबा गणपती मंडळाच्या ‘श्रीं’ची महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत आरती झाल्यानंतर दिमाखदार विसर्जन मिरवणूक सुरू झाली.

केसरीवाडा गणपती

मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा सार्वजनिक मंडळ दुपारी अडीचच्या सुमारास बेलबाग चौकात दाखल झाले. बिडवे बंधू यांचे सनई-चौघडावादन, श्रीराम ढोल-ताशा पथक मिरवणुकीच्या अग्रभागी होते. लोकमान्य टिळकांचा साडेनऊ फूट उंचीचा पुतळा आणि पारंपरिक पालखी असलेली रथामधील ‘श्रीं’ची मूर्ती  हे या मिरवणुकीचे वैशिष्टय़ ठरले. लोकमान्य टिळकांच्या कार्यावर आधारित चित्रफितही या वेळी दाखवण्यिात येत होती.

तुळशीबाग गणपती

चांदीच्या दागिन्यांनी मढविलेली श्रींची भव्य मूर्ती आणि विपुल खटावकर यांनी वैविध्यपूर्ण फुलांची सजावट करून साकारलेला  शेषात्मक गणेश रथ हे तुळशीबाग या मानाच्या चौथ्या गणपतीचे प्रमुख आकर्षण ठरले.  लोणकर बंधूंचे नगारावादन, स्वरूपवर्धिनी, गजलक्ष्मी ढोल ताशा पथकांनी सादर केलेले विविध ताल, हिंद तरूण मंडळाचे ढोल-ताशा पथक यांनी उपस्थितांना ठेका धरायला लावला. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तुळशीबाग गणपती टिळक चौकात दाखल झाला.

विसर्जन वेळेनुसार

मिरवणुकीतील सर्व पथके बेलबाग चौकातून सहभागी करून घेत मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक लवकर संपविण्याचे या पाचही मंडळांच्या अध्यक्षांनी जाहीर केले होते. तसा दावाही मंडळांकडून करण्यात आला होता. मात्र मानाच्या गणपतींचे विसर्जन होण्यास सायंकाळचे साडेसात वाजले. त्यामुळे मिरवणुकीच्या कालावधीत गेल्या वर्षीच्या तुलनेत फारसा फरक पडला नसल्याचे दिसून आले.

बोलक्या पोपटाची चर्चा

मानाच्या गणपतींचे पूजन झाल्यानंतर बोलक्या पोपटाची चर्चा मिरवणुकीत सुरू झाली. विधान परिषदेचे आमदार शरद रणपिसे यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांना प्रतीकात्मक पोपट देऊन राज्य सरकारच्या बोलघेवडय़ा कारभाराचा निषेध केला. दरम्यान, भाजपच्या आयुषमान योजनेची जनजागृती करण्यासाठी बँक ऑफ इंडियाच्यावतीने रॅली काढण्यात आली.

गुरूजी तालीम मंडळ

सुभाष सरपाले यांनी साकारलेल्या फुलांच्या आकर्षक रथातून गुरूजी तालीम या तिसऱ्या मानाच्या गणपतीचे आगमन सायंकाळी पाचच्या सुमारास टिळक चौकात झाले. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक मार्गस्थ झाली. नादब्रह्म, गर्जना आणि अतुल बेहरे यांचे नादब्रह्म या ढोल-ताशापथकांच्या वादनाने आणि पारंपरिक खेळांनी मिरवणुकीत रंगत आणली.

कसबा गणपती मंडळ

ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपती मंडळाची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने चांदीच्या पालखीतून काढण्यात आली. ‘श्रीं’च्या विलोभनीय मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठय़ा संख्येने आले होते. रमणबाग, रुद्रगर्जना, कामायनी विद्यामंदिर, शिववर्धन, प्रभात ब्रॅण्ड ही पथके मिरवणुकीत होती. पथकांचे बहारदार वादन, त्या तालावर आकाशी उंच नाचणारा भगवा ध्वज अशा उत्साही वातावरणाचा साज मिरवणुकीच्यानिमित्ताने उपस्थितांनी अनुभवला. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या पथकाने सादर केलेला देखावा मिरवणुकीचे आकर्षण ठरला.

तांबडी जोगेश्वरी मंडळ

ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकीतील ढोल-ताशांच्या विविध तालांनी आसमंत निनादून गेले. शिवमुद्रा, ताल, युवा वाद्य या ढोल-ताशा पथकांनी मिरवणुकीत रंगत आणली. घोडय़ावर विराजमान बाल शिवाजी हे मिरवणुकीचे वैशिष्टय़ ठरले. कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळांचे एकापाठोपाठ एक टिळक चौकात आगमन झाल्यामुळे या दोन्ही गणपतींच्या विर्सजन मिरवणुकीचा कालावधी पंधरा मिनिटांनी कमी झाला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button