breaking-newsमहाराष्ट्र

मांत्रिक प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता ससूनमधील तज्ज्ञांची समिती

पुणे,दि.17 – साधारण दोन महिन्यापुर्वी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या डॉक्‍टर, मांत्रिक प्रकरणातील चौकशीसाठी अखेर ससूनमधील डॉक्‍टरांची समिती नेमण्यात आली आहे. पोलिसांनी पत्र लिहित तपासणी करण्याची विनंती केल्यानंतर ही तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल दोन महिने उलटल्यानंतर ही तपासणी का केली जात आहे असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या पत्रानूसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या बैठका झाल्यानंतर उपचारादरम्यान वैद्यकिय निष्काळजीपणा झाला आहे की नाही हे ठरविण्यात येणार आहे. तसा निकाल अलंकार पोलीस ठाण्याला देण्यात येणार आहे.
-डॉ. अजय तावरे, वैद्यकिय अधीक्षक, ससून रुग्णालय

सिंहगड रस्ता येथे रहाणाऱ्या संध्या गणेश सोनवणे या 24 वर्षीय महिलेचा 11 मार्चला एरंडवण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. संध्या यांच्या छातीमध्ये दुधाच्या गाठी झाल्याने त्या उपचार घेत होत्या. यानंतर संध्याचा भाउ महेश जगताप यांनी रुग्णालयाबाहेरील खासगी डॉक्‍टर डॉ. सतीष चव्हाण याने दीनानाथच्या आयसीयुमध्ये मांत्रिक बोलावून मंत्र – तंत्र व उतारा केला असल्याचा व्हिडिओच दाखवून एकच खळबळ उडवून दिली होती. मांत्रिक प्रकरणावरून खूप वादंग झाले होते. तसेच नातेवाईकांनी मांत्रिक आणि त्याला घेऊन येणारा डॉक्‍टर सतीश चव्हाण यांच्याविरुध्द अलंकार पोलीस ठाण्यात जादुटोणा प्रतिबंधक कायदयानूसार गुन्हा दाखल झाला होता.
या एकूणच प्रकरणानंतर पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून चौकशीही करण्यात आली होती. या चौकशीनंतर पालिकेने अहवाल राज्य आरोग्य विभागाकडे पाठविला. मात्र या अहवालात कोणताही निष्कर्ष काढला नसल्याचे सांगत राज्य आरोग्य विभागाने पुन्हा हा अहवाल संपूर्ण चौकशी करण्यासाठी पालिकेकडे पाठविला. याबाबत चौकशी करण्यासाठी पालिकडे सक्षम डॉक्‍टरांची टीम नसल्यामुळे पालिकेने याबाबत ससून रुग्णालयाला पत्र लिहित समिती तयार करुन चौकशी करण्याची विनंती केली. या पत्राला ससून प्रशासनाकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. याबाबत ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले यांना विचारले असता ते म्हणाले, पालिकेचे पत्र आमच्याकडे आले आहे मात्र त्याबरोबरच पोलिसांनीही आम्हाला पत्र लिहिले आहे. त्यामुळे पोलिसांच्या पत्रानुसार आम्ही समिती स्थापन केली आहे. ही समिती चौकशी करेल. याबाबत पालिकेच्या पत्रावर वेगळी कार्यवाही करण्याची गरज नाही.

पाच तज्ज्ञांची समिती
वैद्यकिय निष्काळजीपणाची पडताळणी करण्यासाठी ससूनच्या पाच तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये न्यायवैदयकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. बी. पुनपाळे, औषधशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. शशिकला सांगळे, भूलतज्ज्ञ विभागाचे प्राध्यापक, शल्यचिकित्सा विभागाचे सहयोगी प्राध्यापक आणि समितीचे अध्यक्ष व वैद्यकिय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांचा समावेश आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button