‘महाशिवआघाडी’ नव्हे ‘महाविकासआघाडी’; शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचं नवं नाव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/unnamed-2.jpg)
मुंबई : राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं संयुक्तरित्या स्थापन होणाऱ्या सरकारचं नाव ‘महाशिवआघाडी’ नाही तर ‘महाविकासआघाडी’ असेल अशी माहिती समोर येत आहे. जेव्हापासून या हे सरकार स्थापन होण्याची चिन्हं दिसू लागली तेव्हा त्याला महाशिवआघाडी सरकार असं नाव देण्यात आलं. मात्र हे नाव काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मंजूर नसल्याची माहिती समोर आलीय. महाशिवआघाडी या नावात फक्त शिवसेनेचं नाव असल्याने त्याला आघाडीच्या कालच्या संयुक्त बैठकीत आक्षेप घेतल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे आता हे नाव बदलून महाविकासआघाडी असं करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेबाबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामधील चर्चा अंतिम टप्प्यात आहे आणि सरकार स्थापनेच्या जवळ पाऊल टाकलं आहे. वेगवेगळ्या विचारधारा असलेल्या या तिन्ही पक्षांची किमान समान कार्यक्रमावर सहमती काँग्रेस आपल्या विचारधारेशी कोणतीही तडजोड करणार नाही, हे आघाडीच्या बैठकीत ठरलं आहे. बैठकीत किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. वादग्रस्त मुद्दे ना शिवसेना उपस्थित करणार ना काँग्रेस-राष्ट्रवादी. यावर सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी शिक्कामोर्तब केलं आहे.