महापालिका-कॅन्टोन्मेंट वादाचा दुसरा अंक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/pune-contoment-and-corporation-.jpg)
- हद्दीच्या प्रश्नावरून नालेसफाई मात्र रखडली
पुणे- पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील माणिक नाला, फिलिप नाल्याची स्वच्छता सुरू झाली. मात्र, भैरोबा नाल्यातील काही भागातील सफाईवरून महापालिका आणि कॅन्टोन्मेंट यांचा हद्दीचा वाद निर्माण झाला आहे. बोर्डाने मात्र आपल्याच हद्दीतील नाला सफाई करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यापूर्वी या दोन्ही प्रशासनांत जलवाहिनीवरून असाच प्रश्न उद्भवला होता.
सर्वांत मोठ्या भैरोबा नाल्याचा काही भाग स्थानिक लष्करी प्रशासनाच्या अखत्यारीत येत असल्याने तेथील सफाई कोणी करावी? हा प्रश्न निर्माण झाला आहे. नाल्याच्या या भागाची सफाई, देखभाल-दुरुस्तीसाठी बोर्डाने लष्कराकडे वारंवार विनंती करूनही या कामासाठी ना-हरकत प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे बोर्डाने केवळ आपल्या हद्दीतील आवश्यक ठिकाणी नाल्याची सफाई करण्याचा पवित्रा घेतला आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून 7.5 किलोमीटर लांबीचा भैरोबा नाला वाहतो. त्याची सफाई होत नसल्याने त्याचा परिसर अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त झाला आहे. नाल्यामध्ये कचरा आणि झाडेझुडपे वाढल्याने मैला पाणी अडून डासांचा प्रादूर्भाव वाढत आहे. याशिवाय कॅन्टोन्मेंटमधून माणिक नाला आणि फिलिप नालाही वाहतो. या तीनही नाल्यांची दरवर्षी देखभाल-दुरुस्ती केली जाते. त्यानुसार माणिक नाला आणि फिलिप नाल्याच्या साफ-सफाईची कामे सुरू आहेत, तर भैरोबा नाल्याच्या देखभाल-दुरुस्ती आणि अद्ययावतीकरणासाठी ना-हरकत प्रमाणपत्र मिळावे म्हणून बोर्डाने लष्कराकडे डिसेंबर, फेब्रुवारी आणि मे मध्ये पत्र पाठवून विनंती केली होती. मात्र, ना-हरकत प्रमाणपत्र न मिळाल्याने हे काम रखडले आहे. ती बाब लक्षात घेत बोर्डाने आपल्या हद्दीतीलच आवश्यक ठिकाणी नाल्याची सफाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविणार
राज्य सरकारच्या “नमामि चंद्रभागा’ उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व नाल्यांचे सुशोभीकरण केले जात आहे. त्याअंतर्गत प्रारंभी भैरोबा नाल्याच्या 100 मीटर परिसर सुशोभित केला जाणार आहे. त्यानंतर त्याची छायाचित्रे आणि नाल्याच्या विकासाचा प्रस्ताव संरक्षण विभाग तसेच राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे, असे बोर्ड प्रशासनाने सांगितले.