मराठा क्रांती मोर्चाचा मराठा समाजाच्या नवीन पक्षाशी संबंध नाही
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/4Maratha_Res.jpg)
- मराठा क्रांती मोर्चाचे स्पष्टीकरण
पुणे– मराठा समाजातील काही जणांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे.या राजकीय पक्षाशी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण आज मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने देण्यात आले.
मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज या दोन्ही संघटना या राजकारण विरहीत असणार आहेत.त्या कोणत्याही पक्षामध्ये सहभागी होणार नाहीत किंवा कुठल्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही.फक्त समाजाच्या हितासाठी आणि विकासासाठी कार्यकरत राहणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर,रघुनाथ चित्रे-पाटील,तुषार काकडे यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
यावेळी बोलताना कुंजीर म्हणाले,मराठा समाजाच्यावतीने विविध ठिकाणी करण्यात आलेल्या आंदोलनानंतर कार्यकर्त्यांवर शासनाच्यावतीने जी कारवाई झाली आहे त्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन ही कारवाई मागे घेण्यासाठी मोर्चाच्यावतीने समिती नेमली जाणार आहे त्यासाठी काही वकिलांचा समावेश या समितीमध्ये करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे येत्या सोमवारी घोले रस्त्यावरील जवाहरलाल नेहरु आर्ट गॅलरीच्या सभागृहात दिशादर्शक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्यात मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षणासहित केलेल्या विविध मागण्यांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे ही कुंजीर यांनी सांगितले.