भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतले ताब्यात
![Bhoomata Brigade leader Trupti Desai was arrested by the police](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/trupti-desai.jpg)
शिर्डी – शिर्डी येथील साई संस्थानने महिलांच्या ड्रेसकोडाबाबत लावलेला फलक हटवण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई आज (१० डिसेंबर) पुण्याहून शिर्डीकडे जाण्यासाठी रवाना झाल्या होत्या. मात्र, पोलिसांनी त्यांना नगरच्या सीमेवर सुपे टोलनाक्याजवळ रोखलं आणि ताब्यात घेतलं आहे. यावेळी देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधताना आम्ही शिर्डीला जाण्यावर ठाम आहोत अशी भूमिका मांडली आहे.
वाचा :-भूमाता ब्रिकेडच्या तृप्ती देसाई व ब्राम्हण महासंघाचे आनंद दवेंना अहमदनगर पोलिसांची नोटीस
देसाई म्हणाल्या,”साई संस्थानने महिलांच्या ड्रेसकोडबाबत लावलेला तो बोर्ड हटवण्यासाठी आम्ही शिर्डीला चाललो आहोत. याद्वारे आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न होत आहे. आमचा हक्क मिळवण्यासाठी आम्ही शिर्डीकडे निघालो आहोत. मात्र, पोलिसांनी आम्हाला नगरच्या आधीच अडवलं असून याद्वारे आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण पोलिसांनी कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही शिर्डीला जाणारच आहोत.” तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सुपे पोलीस ठाण्यात नेण्यात आले.