भाजप सरकारच्या कर्जमाफीचा शेतक-यांना मनस्ताप; कॉंग्रेसचे सत्यजित देशमुख यांची टिका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/IMG-20180707-WA0006-1.jpg)
शिराळा (प्रतिनिधी) – सरकारने दिलेल्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ कमी पण मनस्ताप जास्त झाला आहे. आजपर्यंत एकाही शेतकऱ्याच्या बँक खात्यावर एक रुपया जमा नाही. फसवेगिरी करणारी हि कर्जमाफी आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी केली.
शिराळा येथे विविध गावच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना सत्यजित देशमुख म्हणाले, कॉंग्रेस सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली होती. याचा सर्वात जास्त फायदा शेतकऱ्यांना मिळाला. तर, दुसरीकडे भाजप सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली त्याचा मनस्ताप शेतकऱ्यांना झाला आहे. एक वर्षात या कर्जमाफीचा गोंधळ अद्याप मिटलेला नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार म्हणून सांगितले होते. परंतु, अद्याप माफी मिळालेली नाही. या सरकारच्या विरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपवरील नाराजीचा फायदा उचलला पाहिजे. लोकांपर्यंत जावून भाजपच्या चुकीच्या धोरणाची माहिती लोकांपर्यंत पोहचवा. भाजप सरकार सर्व पातळीवर पूर्णता अपयशी ठरले आहे. महागाई वाढली आहे, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. जनता त्रासली असून भाजप सरकारच्या विरोधात उठाव करा, असे आवाहन देशमुख यांनी केले.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती हणमंतराव पाटील, के.डी.पाटील, तालुका कॉंग्रेस अध्यक्ष आनंदराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हिंदुराव नांगरे, शामराव कासार, सुजित देशमुख, धनाजी नरुटे, तानाजी कुंभार, संग्राम पवार, जे.डी.खांडेकर, बाजीराव पाटील, हरिभाऊ पाटील, एम.बी.भोसले, बंडू पाटील, प्रदीप पाटील, तानाजी पाटील, संपत पाटील, प्रदीप कदम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.