भाजप खासदार डाॅ.जयसिध्देश्वर महास्वामी यांच्यावर गुन्हा दाखल
डॉ. महास्वामी यांनी दिलेले जात प्रमाणपत्र बनावट, जात पडताळणी समितीकडून केले रद्द
सोलापूर |महाईन्यूज|
जात पडताळणी समितीने भाजपचे खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले. समितीच्या आदेशानुसार अक्कलकोट तहसिलदारांनी सोलापूर न्यायालयात डॉ. महास्वामींविरुध्द फिर्याद दिली. त्यावर बुधवारी (ता. 4) सुनावणी पार पडली. त्यानुसार सदर बझार पोलिसांनी डॉ. महास्वामींविरुध्द गुन्हा नोंद करुन जात प्रमाणपत्राबाबतचा चौकशी अहवाल न्यायालयास सादर करावा, असे आदेश दिले. पुढील सुनावणी 27 एप्रिलला होणार आहे.
लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना डॉ. महास्वामी यांनी दिलेले जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आक्षेप घेत मिलिंद मुळे, प्रमोद गायकवाड यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जात पडताळणी समितीसमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली.
जात पडताळणी समितीने नियुक्त केलेल्या दक्षता पथकाने डॉ. महास्वामी यांनी दिलेले पुरावे बनावट असल्याचा अहवाल पडताळणी समितीला दिले. त्यानुसार पडताळणी समितीने डॉ. महास्वामी यांना मूळ जात प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. मात्र, समितीला शेवटपर्यंत मूळ प्रमाणपत्र मिळाले नाही. सुनावणीच्या शेवटच्या दिवशी दाखला गहाळ झाल्याची फिर्याद वळसंग पोलिस ठाण्यात नोंदविल्याची प्रत पडताळणी समितीला देण्यात आली. दरम्यान, समितीने डॉ. महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले.
अक्कलकोट तहसिलदारांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर बझार पोलिसांनी खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांच्याविरुध्द 156/3 प्रमाणे गुन्हा नोंद करावा. तहसिलदारांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन त्याचा अहवाल न्यायालयास सादर करावा, असे आदेश सोलापूर न्यायालयाने बुधवारी (ता. 4) दिले. फिर्यादी सुनावणीवेळी गैरहजर असल्याचे न्यायालयाने निकालात नमूद केले. या प्रकरणी पुढील सुनावणी 27 एप्रिलला होणार असल्याची माहिती तक्रारदार प्रमोद गायकवाड यांनी दिली.