भंडाऱ्याजवळ अपघातात भुसावळचे दोन भाऊ ठार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/acccident.jpg)
भंडारा | महाईन्यूज
बोलेरो पीकअप वाहनाचे पंक्चर झालेले चाक बदलविताना समोरुन आलेल्या भरधाव कारने धडक दिल्याने भुसावळ येथील दोन सख्खे भाऊ जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर भंडारा नजिक भिलेवाडा येथे मंगळवारी सकाळी ६ वाजता घडली आहे. गुरुमीतसिंह बलराजसिंह बल (४०), जगरुत सिंह बलराजसिंह बल (३५) दोघे रा. जामनेर रोड बालाजी मार्बल भुसावळ जि.जळगाव अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे बिलासपूर येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरुन मंगळवारी भुसावळकडे जात होते.
भंडारा शहरापासून ५ किमी अंतरावरील भिलेवाडा जवळील पेट्रोलपंपाजवळ त्यांच्या बोलेरो पीकअप वाहनाचे चाक पंक्चर झाले. चाक बदलविण्यासाठी वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले. चाक बदलवित असताना समोरुन आलेल्या भरधाव कारने या दोन्ही भावांना अक्षरश: चिरडत नेले आणि कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या अपघाताची माहिती होताच कारधा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. दोन्ही भावांचे मृतदेह राष्ट्रीय महामार्गावर छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेले होते. पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेत भंडारा येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केले. मात्र या दोघांचीही सुरुवातीला ओळख पटली नव्हती. नंतर दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांच्याजवळील कागदपत्रे आणि नातेवाईकांनी दिलेल्या माहितीवरुन हे दोघे भुसावळ येथील राहणारे असून सख्खे भाऊ असल्याची माहिती पुढे आली आहे.