breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

‘बेस्ट’ निर्णयाचा फायदा

प्रवासी संख्येत ६३ हजारांची वाढ; आर्थिक तोटाही घटला

बेस्टचे तिकीट पाच रुपये केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच बेस्टच्या प्रवाशी संख्येत आणखी भर पडली. इतकेच नव्हे तर वाढत्या प्रवाशी संख्येमुळे बेस्टचा मंगळवारचा तोटाही घटला आहे.

बेस्टचे प्रवासी एका दिवसात पाच लाखाने वाढले होते, तर बुधवारी १० जुलै रोजी त्यात आणखी ६३ हजार प्रवाशांची भर पडली. त्यामुळे बेस्टची प्रवासी संख्या ५ लाख ६५ हजारावर गेली आहे. प्रवाशांच्या या वाढत्या संख्येमुळे आदल्या दिवशी आलेला तोटाही काही प्रमाणात कमी झाला आहे. मंगळवारी बेस्टची तूट ६७ लाख रुपये होती. ती कमी होऊन बुधवारी ६३ लाखांवर आली होती.

बेस्टच्या तिकिटाचे दर पाच किमीसाठी पाच रुपये करण्याचा निर्णय मंगळवारपासून लागू झाल्यामुळे बेस्टचे उत्पन्न व खर्चाचे गणितच बदलले आहे. मात्र या निर्णयामुळे शेअर रिक्षा व टॅक्सीचे प्रवासी हळूहळू पुन्हा बेस्टकडे वळू लागले आहेत. सलग दुसऱ्या दिवशीही बेस्टच्या प्रवासी संख्येत भर पडली आहे. बेस्टच्या २७ डेपोमध्ये झालेल्या तिकीट विक्री आणि तिकिटातून मिळालेल्या उत्पन्नाच्या आकडेवारीवरून हे वास्तव पुढे आले आहे. मंगळवारी जितके प्रवासी वाढले त्यात आणखी ६३ हजार प्रवाशांची बुधवारी भर पडली. त्यामुळे तिकीटकपातीच्या निर्णयाबद्दल मुंबईकरांना जसजशी माहिती होत जाईल तसतसे प्रवासी आणखी वाढतील, अशी अपेक्षा बेस्टला आहे. गुरुवारीही बेस्टचे कर्मचारी, तिकीट तपासनीस बसस्टॉपवर उभे राहून पाच रुपये तिकीट, पाच रुपये तिकीट.. ओरडून सांगत होते. त्यामुळे एरवी शुकशुकाट असलेले बसस्टॉप गेल्या दोन दिवसांपासून प्रवाशांनी गजबजलेले दिसत आहे.

दरम्यान, बेस्टला दरदिवशी ६० लाखांपर्यंत नुकसान झाल्यास महिन्याकाठी १८ कोटींचे नुकसान सोसावे लागणार आहे. बसगाडय़ांच्या ताफ्यात वाढ होईपर्यंत पुढील काही महिन्यांसाठी हे नुकसान सोसावे लागणार आहे. प्रवाशांचा हा उत्साह टिकून राहिला तर नुकसान कमी होईल, अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

वातानुकूलित बसचे नवीन मार्ग

तिकिटाची दरकपात केल्यानंतर बेस्ट प्रशासनाने प्रवाशांना आणखी एक सुखद धक्का दिला आहे. वातानुकूलित बसचे तीन नवे मार्ग सुरू करण्यात आले आहेत. दरकपात करताना बेस्टने वातानुकूलित बसगाडय़ांचे किमान तिकीटही ६ रुपये केले होते. मात्र बेस्टकडे वातानुकूलित गाडय़ा नसल्यामुळे या सुविधेचा लाभ प्रवाशांना मिळत नव्हता. मात्र वांद्रे-कुर्ला संकुलासाठी एमएमआरडीएने २५ वातानुकू लित गाडय़ा दिल्या होत्या. या गाडय़ाकेवळ वांद्रे स्थानकापर्यंत तसेच बोरिवलीपर्यंत चालू आहेत. बेस्टकडे नवीन वातानुकूलित  गाडय़ा येईपर्यंत त्यापकी काही गाडय़ा या नवीन मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

उपनगरांतील प्रवाशांत वाढ

बसडेपो     वाढलेले प्रवासी

दिंडोशी     ३७,४२५

गोराई     ३०,२०९

पोयसर    २८,६८०

ओशिवरा   २७,४०४

मरोळ     २६, ४३६

घाटकोपर   २६, २८२

आणिक आगार   २५, ४९०

मुलुंड      २४,०४६

हे आहेत मार्ग

* एएस १ – सीएसएमटी ते एनसीपीए

* एएस २ – वर्ल्ड ट्रेड सेंटर ते चर्चगेट स्थानक

* एएस १७२ – पी के कुरणे चौक ते प्लाझा सिनेमा

मंगळवारी पहिल्या दिवशीचा फरक

* प्रवासी- ५ लाख २ हजार ८१३ वाढले (+२९.३१ टक्के)

* उत्पन्न- ६६ लाख ९८ हजार ५६३ हजारांनी कमी झाले (-३१.५५ टक्के)

बुधवारी दुसऱ्या दिवशीचा फरक

* प्रवासी – ५ लाख ६४ हजार ८७७ प्रवासी (+३२.९ टक्के)

* उत्पन्न – ६३  लाख ९० हजार ०८६ (-३०.१ टक्के)

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button