बुलडाण्यात दहा रुपयांच्या उधारीसाठी दारु विक्रेत्याने एकाला पेट्रोल टाकून जिवंत पेटवलं, गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/burn.jpg)
बुलडाणा | दारुच्या उधारीच्या पैशांसाठी अवैध दारु विक्रेत्याने (Man Set On Fire) एका व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथे काल रात्री ही धक्कादायक घटना घडली. या घटनेत पीडित व्यक्तीवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आरोपीवर मलकापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात अवैध धंद्यावाल्यांनी डोके वर काढले आहे. देवधाबा येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारुविक्री होत आहे. दारु विक्रेत्यांचे ऊधारीचे पैसै वसुल करण्यासाठी जिवंत माणसाला जाळण्यापर्यंत मजल पोहचली आहे. देवधाबा येथील काशिनाथ राजाराम उगले (वय 45) हा गावातील अवैध दारु विक्रेते अशोक गणपत भिसे यांच्या घरी दारु पिण्यासाठी गेला. दारु मागितली असता यावेळी भिसे याने मागील ऊधारीचे दहा रुपये दे, मग दारु देतो, असे म्हटले.
मात्र काशीनाथ उगले याने नंतर देतो म्हणून सांगितलं आणि पुन्हा दारु मागितली. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. यावेळी अवैध दारु विक्रेता अशोक भिसे याने घरात जाऊन प्लास्टिक बॉटलमध्ये पेट्रोल आणले आणि काशिनाथ राजाराम उगले याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवुन दिले. यात उगले गंभीर भाजला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं.
पीडित व्यक्तीला जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला, याबाबतची तक्रार काशिनाथ राजाराम उगले याने ग्रामीण पोलिसांना दिली. ग्रामीण पोलिसांनी अशोक भिसे यांच्या विरुद्ध कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर पोलिसांनी तात्काळ अशोक भिसे याला अटकही केली आणि आज त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.