breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत मनुष्यबळ विकासमंत्र्यांशी लवकरच चर्चा – शेलार

मुंबई : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२वी) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसमोर विज्ञान विषय गटांमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे निर्माण झालेल्या अडीअडचणी व विविध प्रश्नांबाबत शासन गांभीर्यपूर्वक लक्ष देत असून त्यांच्या अडचणी तातडीने सोडविण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री आशीष शेलार यांनी बुधवारी विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.

तर पर्सेटाईल घोळाबाबत प्रवेश नियामक प्राधिकरणासोबत चर्चा करणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

अजित पवार, जयंत पाटील, मेधा कुलकर्णी आदी सदस्यांनी १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाच्या प्रवेशावरून निर्माण झालेल्या अडचणीबाबत मांडलेल्या लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान शेलार यांनी ही ग्वाही दिली. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राप्त गुणांबाबत साशंकता आहे. त्यांच्यासाठी गुणपडताळणी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती देणे व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पुनर्मूल्यांकन करणे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

कौन्सिल ऑफ बोर्ड्स ऑफ स्कूल एज्युकेशन इन इंडिया (कॉब्से) ही देशातील शैक्षणिक शिखर संस्था आहे. देशातील शालेय शिक्षणात समन्वय साधण्याचे काम या संस्थेमार्फत केले जाते. कॉब्सेच्या समितीने देशपातळीवर इयत्ता ११ वी आणि १२ वी साठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित आणि संख्याशास्त्र या विषयांच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांचा समान प्रश्नपत्रिका आराखडा तयार केलेला आहे. या आराखडय़ाची अंमलबजावणी इयत्ता ११वी साठी मागील शैक्षणिक वर्षांपासून सुरू करण्यात आली असून इयत्ता १२वी साठी यंदा अमलात आणली आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांच्या निकालात थोडी घट झाल्याचे शेलार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले सर्व संबंधित प्रमाणपत्रे योग्य मुदतीत मिळावी यासाठी इतर संलग्न विभागाची बैठक तातडीने घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र प्रवेशाच्या राज्य स्तरावरील प्रवेश परीक्षेच्या निकालात पर्सेटाईल पद्धतीत झालेल्या गोंधळाबाबत प्रवेश नियामक प्राधिकरणासोबत चर्चा करणार असल्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

’ जे विद्यार्थी जेईई, जेईई अ‍ॅडव्हान्स या स्पर्धा परीक्षांमध्ये प्रविष्ट झाले आहेत. त्यांच्या बाबतीत गुणपडताळणी, छायाप्रती देणे व पुनर्मूल्यांकन यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे, असेही शेलार यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button