breaking-newsपुणेमहाराष्ट्र

बडतर्फ डॉक्टरांची माहिती आता संकेतस्थळावर

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय

रुग्णांना सेवा पुरविण्यात दिरंगाई करणाऱ्या किंवा बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्या डॉक्टरांवर बडतर्फीची कारवाई केल्यानंतर अशा बडतर्फ डॉक्टरांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचा निर्णय महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलतर्फे घेण्यात आला आहे. बडतर्फीची कारवाई झालेल्या डॉक्टरांनी इतर राज्यांत नावनोंदणी करून व्यवसाय करू नये यासाठी ही यादी इतर राज्यांतील मेडिकल कौन्सिलकडेही पाठवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी ही माहिती दिली. डॉ. उत्तुरे म्हणाले, डॉक्टरांकडून होणारे गैरव्यवहार, रुग्णांची लुबाडणूक अथवा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांची झळ इतर रुग्णांना बसू नये यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. डॉक्टरांच्या गैरकृत्याबद्दलची तक्रार कौन्सिलला प्राप्त झाली असता त्याची रीतसर सुनावणी होते आणि गुन्हय़ाचे स्वरूप विचारात घेता सहा महिन्यांसाठी डॉक्टरला बडतर्फ करण्याची तरतूद मेडिकल कौन्सिल कायद्यात आहे. बडतर्फ डॉक्टरने इतर राज्यांत जाऊन पुन्हा नावनोंदणी करून काम सुरू करू नये यासाठी बडतर्फ करण्यात आलेल्यांची नावे संकेतस्थळावर, तसेच इतर राज्यांच्या कौन्सिलकडे पाठवण्यात येणार आहेत. काही विशिष्ट प्रकारच्या गंभीर गुन्हय़ांमध्ये आरोप सिद्ध झालेल्या डॉक्टरांचा वैद्यकीय व्यवसाय करण्याचा अधिकार कायमचा काढून घेण्याचे अधिकारही कौन्सिलला आहेत, तशा प्रकारची कारवाई झालेल्या डॉक्टरांची माहिती देखील संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, मेडिकल कौन्सिल कायद्याचे उल्लंघन, वैद्यकीय व्यवसायाची नीतिमूल्ये पायदळी तुडवणे अशा विविध कारणांसाठी बडतर्फीची कारवाई झालेल्या डॉक्टरांची माहिती रुग्णांना मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे अशा डॉक्टरांची नावे संकेतस्थळावर असणे योग्य आहे. बडतर्फीची मुदत संपताच संबंधित डॉक्टर कौन्सिलकडे अर्ज करून आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा कामकाजास सुरुवात करू शकतात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button