बंदोबस्तासाठी आता 50 लाख शुल्क
क्रिकेट सामन्यांसाठी पोलिसांकडून शुल्क निश्चित
टेस्ट मॅचसाठी 40 लाख रुपये मोजावे लागणार
पुणे – राज्य शासनाने क्रिकेट सामन्यांसाठी पुरवाव्या लागणाऱ्या पोलीस बंदोबस्तांचे शुल्क निश्चित केले आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील गहुंजे येथे होणाऱ्या टी-20, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी आता 50 लाख रुपये इतके शुल्क द्यावे लागणार आहे.
राज्यात मुंबई, नागपूर, पुणे आणि नवी मुंबई या ठिकाणी क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात येतात. या क्रिकेट सामन्यांमध्ये संघाची लोकप्रियता व स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन सामन्यांकरीता आवश्यकतेनुसार विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येतो. विविध कालावधीमध्ये होणाऱ्या क्रिकेट सामन्यांकरिता पोलीस बंदोबस्तासाठी आकारावयाचे शुल्क शासनाकडून निश्चित करण्यात येतात. त्यानुसार शासनाने मार्च 2019 पर्यंत आकारावयाचे शुल्क निश्चित केले आहे.
पुणे, नागपूर आणि नवी मुंबई येथे आयोजित करण्यात येणाऱ्या टी-20 आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांकरीता 50 लाख रुपये इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. तर, टेस्ट मॅचसाठी 40 लाख रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहे. बंदोबस्ताचे शुल्क एक ठोक रक्कम बंदोबस्त खर्च म्हणून निश्चित करण्यात आली आहे. या सुरक्षिततेमध्ये स्टेडियमच्या आत व बाहेरील सुरक्षा व्यवस्थेचाही समावेश आहे.
एक महिन्याच्या आत जमा करावे लागणार
क्रिकेटचा सामना झाल्यापासून एक महिन्याच्या आत हे शुल्क जमा करण्यात यावे. अन्यथा पोलीस नियमावलीमधील तरतुदींनुसार 9.5 टक्के दराने चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारण्यात येईल, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.