प्रेयसीला जिवे मारण्याचा प्रियकराचा प्रयत्न
![Shocking! Six die after drinking sanitizer in Yavatmal](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/poison-drink.jpg)
अमरावती : प्रियकराकडे लग्नाचा तगादा लावणाऱ्या गर्भवती प्रेयसीला विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील घारफळ येथे घडली. पोलिसांनी याप्रकरणी प्रियकरासह तिघांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे.
आरोपी आणि पीडित युवतीचे प्रेमसंबंध होते. त्यातून तरुणीला गर्भधारणा झाली. अशातच त्या तरुणीचे दुसऱ्या मुलासोबत लग्न झाले. मात्र, मुलगी गर्भवती असल्याचे कळताच त्या मुलाने घटस्फोट दिला. त्यानंतर पीडित तरुणीने प्रियकराकडे लग्नाची मागणी केली. सुरुवातीला होकार देणाऱ्या प्रियकराने नंतर टाळाटाळ सुरू केली आणि तरुणीला गर्भपात करण्यास भाग पाडले. नंतर विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी घारफळ येथील सुधीर नारायण पातुरकर (२३), विकास नारायण पातुरकर (२४) व नारायण बापूराव पातुरकर (५१) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
प्रेमसंबंधातून तरुणीला गर्भधारणा झाल्यानंतर ही बाब तरुणीने सुधीरला सांगून लग्नाची मागणी केली. त्यावर सुधीरने लग्नास नकार दिला. तसेच या प्रकाराची वाच्यता केल्यास तिला जिवे मारण्याची धमकीसुद्धा दिली. त्यामुळे तरुणीने या गंभीर प्रकाराबाबत आई-वडिलांसह कुणालाही सांगितले नाही. या काळात तरुणीच्या वडिलांनी तिचे एका तरुणासोबत लग्न लावून दिले. लग्नानंतर तरुणी सासरी गेली. त्यानंतरही सुधीर तरुणीला भ्रमणध्वनीवरून त्रास देऊ लागला. दरम्यान, लग्नाच्या दोन महिन्यांनंतर तरुणीची प्रकृती बिघडली. त्यामुळे पती व सासूने तिला रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तरुणी ४ महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले.
त्यामुळे पतीने घटस्फोट घेतला. या घटनेनंतर ८ दिवसांनी सुधीर पुन्हा तरुणीच्या घरी गेला. त्याने लग्नासाठी आपल्याला काही अवधी देण्याची मागणी केली. त्यानंतर तरुणीला घेऊन तो अमरावतीत आला. येथे एका खासगी रुग्णालयात त्याने तरुणीचा गर्भपात केला. लग्नाचे खोटे आश्वासन देऊन त्याने तरुणी व तिच्या आईवडिलांचा मानसिक व शारीरिक छळ केला. सुधीरने तरुणीला आपल्या घरी बोलावले. आरोपी सुधीरने वडील नारायण, भाऊ विकास व आई यांच्या मदतीने तरुणीस जिवे मारण्याच्या उद्देशाने विष पाजले. ही बाब तरुणीच्या कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले.