पुण्यात सैराटची पुनरावृत्ती, भावाने केला बहिणीच्या नवऱ्याचा खून
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/love-murder.jpg)
तीन वर्षांपुर्वी आलेल्या सैराट चित्रपटाने समाजातील एक कटू वास्तव जगासमोर मांडले. प्रेमविवाहाला आजही आपल्या समाजाने पुर्णपणे स्विकारलेले नाही. आजही अनेक ठिकाणी ऑनर किलिंगच्या घटना पाहायला मिळतात. अशीच एक थरकाप उडवणारी घटना पुण्यात घडली आहे. सैराट चित्रपटाची आठवण देणा-या या घटनेत तथाकथीत ‘प्रिन्स’ दादाने प्रेमविवाह केलेल्या बहिणीच्या पतीची हत्या केली आहे. बहिणीने घरच्यांचा विरोध पत्करून प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून पुण्यात भावाने तिच्या प्रियकर पतीस चाकूचे सपासप वार करून ठार केले. या घटनेचा तपास लष्कर पोलीस करीत आहे. सुलतान महमंदहुसेन सय्यद वय २४, रा. महंमदवाडी रोड असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील महंमदवाडी येथे सुलतान सय्यद हा राहण्यास होता. सुलतानने एक वर्षापूर्वी प्रेम विवाह केला होता. हा प्रेम विवाह त्या तरुणीच्या घरातील मंडळींना मंजूर नव्हता. या प्रकरणावरून त्या तरुणीच्या कुटुंबातील व्यक्तीसोबत आणि सुलतानमध्ये वादाचे प्रकार देखील घडले होते. सुलतान हा कॅम्प परिसरात नारळपाणी विक्रीचा व्यवसाय करायचा. शनिवारी देखील नेहमी प्रमाणे दुकानावर असताना रात्रीच्या सुमारास अरबाज आणि त्याचे दोन साथीदार तेथे आले. त्यांच्यामध्ये पुन्हा वादाचा प्रकार घडला.
या वादामध्ये अरबाज आणि त्याच्या साथीदारांनी सुलतानच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर तेथून त्या तिघानी पळ काढला. या प्रकारानंतर सुलतानला नागरिकांनी जवळील रुग्णालयात दाखल केले असता तो मृत झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी आरोपींचा शोध घेतला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.