पुण्यातील उमेदवारांच्या नावांवरून काँग्रेसमध्ये वाद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Congress-Party.jpg)
पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसकडे शिफारस करण्यात आलेल्या नावांबाबत काँग्रेसमध्ये वाद सुरू झाला आहे. प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात आलेली यादी कोणी निश्चित केली अशी विचारणा करत माजी मंत्री आणि लोकसभा निवडणुकीसाठीचे इच्छुक उमेदवार, माजी मंत्री चंद्रकांत ऊर्फ बाळासाहेब शिवरकर यांनी उमेदवारांच्या नाव निश्चितीला आक्षेप घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड आणि महापालिकेतील गटनेता अरविंद शिंदे या तिघांच्या नावांची शिफारस प्रदेश काँग्रेसकडे करण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर शिवरकर यांनी नाव निश्चिती करण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप नोंदविला असून यासंदर्भात पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे दाद मागणार असल्याचे सांगितले.
काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीसाठी मी पुण्यात पाच दशके काम केले आहे. लोकसभेसाठी माझे नावही चर्चेत होते, मात्र ते वगळण्यात आले आहे. नगरसेवक, महापौर, शहर अध्यक्ष, आमदार, मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या मी पार पाडल्या आहेत. त्याआधारेच लोकसभेसाठी दावा केला होता. शहर पातळीवर जाणीवपूर्वक माझे नाव वगळण्यात आले आहे आणि मी माघार घेतल्याचा गैरसमज पसरविण्यात येत आहे, असेही शिवरकर यांनी स्पष्ट केले.