पुण्याचे पालकमंत्री पद चंद्रकांत पाटील यांच्याकडे, राज्य शासनाचा आदेश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/54654.jpg)
पिंपरी, (महाईन्यूज) – राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे देण्यात आली आहेत. तर, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद गिरीश महाजन यांना देण्यात आले आहे. राज्य शासनाने याबाबतचा अधिकृत आदेश आज काढला आहे.
पुण्यातून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रिपदाचा आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत पालकमंत्र्यांची नियुक्ती करणे क्रमप्राप्त होते. या पदासाठी स्थानिक आमदारांमध्ये चढाओढ सुरू झाली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच स्थानिकांपैकी एखाद्याची निवड केल्यास अन्य नेत्यांची नाराजी ओढविण्याची भीती होती. तसेच, आणखी एखाद्या आमदारास मंत्रीपद द्यावे लागणार होते. हे टाळण्यासाठी विद्यमान मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांकडे हा पदभार सोपविण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्राधान्य देतील, अशी चर्चा होती.
त्यामध्ये चंद्रकांत पाटील यांच्यासह फडणवीस यांचे विश्वासू नेते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि भाजपच्या उंबरठ्यावर असलेले नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू होती. त्यातून पुण्याचे पालकमंत्री म्हणून पाटील यांची निवड निश्चित झाली आहे. तर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची निवड झाली आहे.