पुणे – पीएमपीमध्ये रोज 62 फुकटे प्रवासी
![The bus pass issued before the lockdown of Pune residents will get extension](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/Pmp-1-.jpg)
एकट्या जुलैमध्ये साडेपाच लाखांचा दंड वसूल
पुणे – दैनंदिन उत्पादनातील तूट भरून काढण्यासाठी पीएमपी प्रशासनाचे विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. अशातच फुकटे प्रवासी डोकेदुखी ठरत असून दिवसेंदिवस त्यांची वाढती संख्या चिंतेचे कारण बनत आहे. जुलै या एकाच महिन्यात रोज सरासरी 62 फुकटे प्रवासी प्रवास करत असल्याचे समोर आले असून प्रशासनाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.
शहरात पीएमपीमधून रोज साधारणतः दहा ते अकरा लाख प्रवासी प्रवास करतात. तरीही, विविध कारणांमुळे पीएमपी तोट्यात आहे. व्यवस्थापनाला उत्पन्नाचे निर्धारित ध्येय गाठताना कसरत करावी लागत आहे. यातच फुकट्या प्रवाशांनी व्यवस्थापनासमोर आव्हान निर्माण केले आहे. जुलैमध्ये फुकट प्रवास करणाऱ्या 1 हजार 866 जणांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून 5 लाख 66 हजार दंड वसूल केला आहे. फुकट्यांना चाप लावण्यासाठी तुकाराम मुंडे यांच्या कार्यकाळात दंडाची रक्कम 100 रुपयावरुन 300 करण्यात आली. तर दैनंदिन अथवा मासिक पासधारकांनी जर पासामध्ये अफरातफर केली, तर अशांकडून 500 रुपये दंड वसूल केला जात आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड व पुणे शहरात मिळून वाहतूक मार्गावर 60 तिकीट तपासणीस काम करतात. ही संख्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी पडत आहे. दरम्यान, येत्या काळात ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे.