पुणे गोळीबार: जिगरबाज! वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेमुळे आरोपी तुरुंगात
पुण्यातील एकता भाटी यांच्या हत्या प्रकरणातील एका आरोपीला वाहतूक पोलीस राजेश शेळके यांच्या धाडसामुळे अटक करण्यात यश आले. पुणे स्टेशनवर पोलीस निरीक्षकावर गोळीबार करुन पळालेल्या आरोपीला राजेश शेळके यांनी प्रसंगावधान दाखवल्याने अटक करण्यात आली. शिवलाल राव असे या आरोपीचे नाव आहे.
पुण्यातील चंदननगर भागातील इंद्रमणी गृहरचना सोसायटीत राहणाऱ्या एकता ब्रिजेश भाटी (वय ३८) यांची बुधवारी सकाळी राहत्या घरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी शिवलाल राव (वय ३२) आणि मुकेश राव हे दोघे झेलम एक्स्प्रेसने पळ काढणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांना पकडण्यासाठी गेलेले पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर आरोपींनी गोळी झाडली होती. यानंतर पोलिसांनी मुकेश रावला रेल्वे स्टेशन परिसरातून अटक केली होती. तर दुसरा आरोपी शिवलाल हा तिथून पळाला होता. त्यामुळे शिवलालचा शोध घेणे हे पोलिसांसाठी आव्हानच ठरले असते.
मात्र, वाहतूक पोलीस दलात कार्यरत असलेले राजेश शेळके यांच्या प्रसंगावधानामुळे शिवलाल तुरुंगात पोहोचला. शिवलालला कसे पकडले हे राजेश शेळके यांनी सांगितले. ते म्हणाले, संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास मालधक्का चौकात एक आरोपी पळताना दिसला. त्याच्यामागे पोलीस देखील होते. त्या आरोपीने पोलिसांच्या दिशेने एकदा गोळीबार देखील केला. ते पाहून मी देखील आरोपीच्या मागे धावत गेलो. आरोपी पुन्हा चौकात गोळीबार करणार त्याच दरम्यान आम्ही एका भिंतींच्या बाजूला थांबलो. तेवढ्यात त्याने गोळीबार केला. त्यावेळी चौकात असलेले नागरिक त्या ठिकाणी आले. आरोपी शिवलाल राव हा चौकातील एका इमारतीमध्ये घुसला. आम्ही त्याच्या मागावर असल्याचे पाहताच शिवलालने पुन्हा आमच्यावर गोळी झाडली. आम्ही पुन्हा भिंतीच्या बाजूला थांबलो. प्रतिकार करण्यासाठी आमच्याकडे काहीच नव्हते. शेवटी आम्ही धाडस दाखवत आत गेलो. त्याला बाहेर पडणे काही शक्य नव्हते, असे त्यांनी सांगितले.
‘आरोपी आणि माझ्यात फक्त १५ फुटाचे अंतर होते. नागरिक इमारतीच्या परिसरात जमले होते. संतप्त नागरिक शिवलालच्या दिशेने दगड फेकत होते. तरी देखील त्याने आमच्यावर पिस्तूल रोखून धरून ठेवली होती. पिस्तूलमधील गोळ्या संपल्या होत्या. शेवटी माझ्या डोक्यात नवा प्लॅन आला’, असे ते सांगतात. ‘मी त्याला सांगितले की पिस्तूल फेकून दे नाही तर तुला लोक दगड मारत राहतील. शेवटी त्याने काही वेळाने पिस्तूल खाली टाकली आणि मी लगेचच त्याला पकडले’, असे त्यांनी सांगितले.
शिवलालची झडती घेतली असता त्याच्या खिशात गोळ्या सापडल्या. म्हणजेच राजेश शेळके आणि त्याच्यात बरेच अंतर असते तर त्याने पिस्तूल भरुन पुन्हा गोळीबार केला असता आणि मोठा अनर्थ घडला असता. राजेश यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.