पीएसआय परीक्षेचा निकाल दोन वर्षांनी जाहीर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/Maharashtra-Police-job-300x241.jpg)
- औरंगाबादचा समाधान दौंड राज्यात पहिला
पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 2016 मध्ये घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील समाधान दौंड यांनी राज्यात प्रथम, सोलापूर जिल्ह्यातील स्वप्नील चावडेश्वर हे मागासवर्गातून प्रथम, तर महिला वर्गातून सांगली जिल्ह्यातील सुप्रिया गायकवाड प्रथम आल्या आहेत. 750 उमेदवारांची पीएसआयपदी निवड करण्यात आली आहे.
ही परीक्षा 2016 मध्ये घेण्यात आली होती. तर मुलाखती ऑक्टोबर 2017 मध्ये घेण्यात आल्या. पूर्व परीक्षा 2 लाख 19 हजार 907 विद्यार्थ्यांनी दिली होती. तर मुख्य परीक्षेकरिता 10 हजार 331 उमेदवार पात्र ठरले मुख्य परिक्षा पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर या केंद्रांवर घेण्यात आली होती. लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे शारीरिक चाचणीसाठी 3 हजार 85 उमेदवार पात्र ठरले होते. यातून मुलाखतीसाठी 1 हजार 795 उमेदवारांना बोलविण्यात आले होते. यातील अंतिम 750 उमेदवारांची पीएसआयपदी निवड करण्यात आली.
हा निकाल समांतर आरक्षणाच्या मुद्यांसंदर्भात तसेच अन्य मुद्यांसंदर्भात विविध न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणांवरील अंतिम निर्णयाच्या अधिन राहून जाहीर केल्याचे एमपीएससीने जाहीर केले आहे.