पिपरी-चिंचवड पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरूच ठेवा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/illegal-construction-.jpg)
- हायकोर्टाचे आदेश – दिड वर्षांत तेराशे बेकायदा बांधकामांवर कारवाई
मुंबई – पुणे, पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीतली ग्रीन झोनमधील अवैध बांधकामे पाडण्याचा उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर गेल्या दिड वर्षात केवळ तेराशे बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पालीकेने आज न्यायालयात दिली. याची दखल घेऊन न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश देताना यापुढेही कारवाई सुरूच ठेवा, असे महापालिकेला बजावले.
या बेकायदा बांधकामांसदर्भात जयश्री डांगे यांच्या वतीने ऍड. उदय वारूंजीकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी विशेष मोहिम आखून कृती अहवाल तयार करण्याचे तसेच 66 हजार 324 बेकायदा बांधकामांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दोन वर्षापूर्वी दिले होते. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती छागला यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी पालिकेने 1 जानेवारी 2017 ते 31 मे 2018 या दिड वर्षात तेराशे बेकायदा बांधकामांवर कारवाई आल्याची माहिती न्यायालयाला दिली.