पालिकेच्या “रोड स्विपर ट्रक’च्या किमतीत गोलमोल?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/road-sweeper-truck-672x420.jpg)
- अव्वाच्या सव्वा किंमत लावल्याचा “सजग नागरिक मंच’चा दावा : 15 कोटी रुपयांचे नुकसान
पुणे – महापालिकेने यांत्रिकी पद्धतीने रस्त्यांची साफसफाई करण्यासाठी ज्या “रोड स्विपर ट्रक’ घेण्याचा निर्णय घेतला आहे, त्या एका ट्रकची किंमत त्यांनी अव्वाच्या सव्वा लावली असून, केंद्राच्या वेबसाइटवरील दरापेक्षा ही किंमत 19 लाख रुपयांनी जास्त आहे. त्यामुळे महापालिकेचे तब्बल 15 कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याची तक्रार “सजग नागरिक मंच’च्या विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्रबुद्धे यांनी केली आहे.
या “रोड स्विपर ट्रक’साठी पाच वर्ष मुदतीच्या 48 कोटी रुपयांच्या निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत. या निविदांमध्ये साफसफाईसाठी घेण्यात येणाऱ्या टाटा कंपनीच्या एका “रोड स्विपर ट्रक’ची किंमत 78 लाख रुपये दर्शविण्यात आली आहे. मात्र, केंद्र सरकारच्या वेबसाइटवर याच कंपनीच्या ट्रकची किंमत ही 59.25 लाख रुपये दर्शविली आहे. स्थायी समितीने या निविदा मंजूर केल्यामुळे महापालिकेचे 15 कोटी रुपये नुकसान होत असल्याचा आरोप “मंच’च्या प्रतिनिधींनी केला आहे. त्यामुळे महापालिकेने मंजूर केलेल्या या निविदा तत्काळ रद्द करण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
महापालिका हे नऊ स्विपर ट्रक खरेदी करताना तब्बल दोन कोटी रुपये जादा मोजणार आहे. हेच ट्रक महापालिकेने विकत घेतले, तर ते डिलर किंमतीला मिळू शकतात. त्यातून महापालिकेचे साडेपाच कोटी रुपये वाचणार आहेत. या निविदांमध्ये महापालिका प्रति किलोमीटर 300 रुपये या स्विपर ट्रकसाठी देणार आहे. तसेच, या ट्रकचा संचलन खर्च (ऑपरेटिव्ह एक्सपेंन्सेस) प्रति किलोमीटर 450 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी तीन प्रभागात मिळून पाच लाख 61 हजार 600 किलोमीटर एवढा काम या ट्रककडून करण्यात येणार आहे. महापालिकेने हे ट्रक विकत घेतले आणि ते ट्रक ठेकेदारांना चालवायला दिले तरी दरवर्षी तीन कोटी रुपयांची बचत होणार आहे. अशा प्रकारे पुढील पाच वर्षांत सुमारे 15 कोटी रुपयांची बचत होणार असल्याचा दावा वेलणकर यांनी केला आहे.
महापालिकेने कंत्राटदाराला संचलन खर्च देऊन हे काम दिले तर त्यापोटी 33 कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यासाठी महापालिकेला केवळ सहा कोटी रुपये खर्च करून नऊ ट्रक विकत घ्यावे लागणार असून ही रक्कम महापालिकेसाठी फारच किरकोळ आहे. त्यामुळे महापालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या या कामाच्या निविदा तत्काळ रद्द करून केवळ या ट्रकच्या संचलन खर्चापोटीच्या निविदा काढण्यात याव्यात, अशी मागणीही मंचच्या प्रतिनिधींनी केली आहे.
काय आहे मूळ मागणी?
या साफसफाईसाठी टाटा कंपनीचे एलपीटी 1613 बीएस-चार हे नऊ “रोड स्विपर ट्रक’ खरेदी करण्यात येणार आहेत. हे ट्रक कंत्राटदार घेणार असून त्यासाठी त्याने प्रति ट्रकची किंमत ही 78 लाख रुपये दर्शविली आहे. या किमतीवर 28 टक्के वस्तू सेवा कर (जीएसटी) आकारण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या जीईम-पोर्टलवर या कंपनीच्या याच मॉडेलच्या ट्रकची किंमत ही 59.25 लाख रुपये दर्शविली आहे. त्यावर 28 टक्के “जीएसटी’ची आकारणी केली तरी ही किंमत 78 लाख रुपयांच्या घरात जात नाही. दरम्यान, याच ट्रकची किंमत ही डिलरसाठी 47 लाख रुपये असल्याचे याच वेबसाइटवर नमूद करण्यात आले आहे. तसेच या 47 लाख रुपयांमध्ये 28 टक्के “जीएसटी’ची आकारणी करण्यात आल्याचे मंचच्या प्रतिनिधींचा दावा आहे.
सजग नागरिक मंचाने या निविदांबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती मागविण्यात आली आहे. ही माहिती आल्यानंतरच या निविदांच्या अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात येईल. महापालिकेचे हीत लक्षात घेऊनच निर्णय घेण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
-सौरभ राव, आयुक्त, मनपा.