breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र
पार्थच्या पाठिशी पूर्ण ताकद लावू, शेकापच्या जयंत पाटलांचा शब्द
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मागील निवडणुकीत थोडी चूक झाली, अशी कबुली देत आम्ही बोलतो ते करून दाखवतो. अजितदादा तुम्ही खाटाखाली लक्ष देवू नका. तिकडे आम्ही आहोत. हा शब्द देत पार्थ पवार यांच्या पाठिशी पुर्ण ताकद लावू, असा शब्द शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीला रविवारी (दि.17) दिला आहे.
चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षा व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचे नातू व मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, ज्येष्ठ नेते नाना काटे आदी उपस्थित होते.
जयंत पाटील पुढे म्हणाले, शहरात गरिबांनी घरे बांधली ती नियमित झाली पाहिजेत. मुंबईत परप्रांतातल्या लोकांना भरपाई दिली जाते. पण, आम्हाची घरे अधिकृत केली जात नाहीत. उद्याचे राजकारण बदलत असून आमच्याकडून चुका झाल्या. तुमच्याकडून चुका झाल्या. पण, उद्याच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा येतील आणि आघाडीचे सरकार येईल. दादा तुम्ही घाटाखाली येवू नका. पार्थ आमचा मुलगा म्हणून काम करू. पुर्ण ताकद त्यांच्या पाठिशी लावू.
रायगडमध्ये सगळ्या जागा आमच्या आहेत. सहकार संस्था शेकापकडे आहेत. रायगडमध्ये वैचारिक कार्यकर्ते आम्ही आहोत. साडेतीन लाखांवर मते दिली, तरच पार्थ पवारांचे काम केले, असे समजा. पार्थची लढाई शेकापची आहे. एक महिना आधी आम्ही कामला लागलो आहोत. नियोजनबध्द काम सुरू असल्याचेही ते म्हणाले.