breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पारदर्शकता ठेवा, तरच लोकशाही सुदृढ होईल

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू : “ब्युटिफुल’ इमारत “ड्युटी फुल’देखील व्हावी
महापालिकेच्या विस्तारीत इमारतीचे उद्‌घाटन

पुणे- या सभागृहात कामकाज करताना जनहिताचे चांगले निर्णय व्हावेत आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न व्हावा. जनतेसाठी कोणतीही योजना राबवताना पारदर्शकता आणि जबाबदारी ठेवली तरच लोकशाही सुदृढ होईल, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी गुरूवारी केले.

पुणे महापालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतीचे उद्‌घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते गुरूवारी झाले. त्यानंतर “हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सभागृहा’त कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तसेच महापौर मुक्ता टिळक, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा आणि जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, महापालिका आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते.

देशातील 620 जिल्ह्यांपैकी किमान 600 जिल्ह्यांमध्ये माझा प्रवास झाला आहे. परंतु पुण्यातील महापालिकेच्या सभागृहाची ही वास्तू अतिशय अप्रतिम बांधली आहे, असे गौरवोद्वार नायडू यांनी काढले. मुंबईनंतर देशात पुण्याची ओळख “एज्युकेशन हब’ आणि सांस्कृतिक शहर म्हणून आहे. मात्र या शहराचा विकास वेगाने होत आहे. केंद्र व राज्यशासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार शहर निर्माण करावे. यातून येथील रहिवाशांना सुविधा देणारे शहर अशी याची ओळख व्हावी, अशी अपेक्षा नायडू यांनी व्यक्त केली.

शब्दांचे यमक जुळवत नायडू हे त्यांच्या स्वतंत्र शैलीत बोलताना म्हणाले, ही इमारत “ब्युटिफुल’ आहे, परंतु ती “ड्युटी फुल’ही झाली पाहिजे तरच ती “माईटी फुल’ होईल.

पुणे शहराचा स्मार्टसिटी योजनेत समावेश झाला आहे. यातील सर्व योजनांच्या कामात पारदर्शीपणा आणि उत्तरदायित्व जोपासले जावे. नागरिकांना कालचे पुणे, आजचे पुणे आणि उद्याचे पुणे याबाबत समजावून सांगितल्यास त्यांचाही सहभाग यात लाभू शकतो. नागरिकांना प्राथमिक गरजा उपलब्ध करून देतांनाच ऑनलाईन सुविधा पुरविण्याच्या प्रयत्न केला जावा. रस्ते तसेच नद्यांवरील अतिक्रमणे दूर व्हावीत, नद्यांमध्ये सांडपाणी सोडले जावू नये. यासाठी जनजागृती करावी. यामध्ये महापौरांनीच पुढाकार घ्यावा असे नाही तर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनीही पुढाकार घ्यावा. “सब काम सरकार करेगा, हम बेकार फिरेगा’ अशी वृत्ती असू नये, अशी अपेक्षा नायडू यांनी व्यक्त केली.

शारीरिक श्रम नसल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे शहरात सायकल ट्रॅक, पदपथांची अत्यंत आवश्‍यकता आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होणे आवश्‍यक आहे. पैसा खूप आहे परंतु त्याबरोबरच मधुमेह, हायपर टेन्शन्स यासारखे रोग असतील तर त्या संपत्तीचा काय उपयोग? महापालिकेने नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, अशा सूचना नायडू यांनी केल्या.

बापट यांनी मनोगत व्यक्त केले. महापौरांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. शहराची ऐतिहासिक परंपरा त्यांनी विशद केली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला शहरावरील अनुबोधपट दाखवण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले डॉ. धेंडे यांनी आभार मानले.

पुणे शहर असेल विकासाचे इंजिन
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार चालवताना नेहमीच रयतेचा विचार केला. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे विचार आणि आचार अंमलात आणून या सभागृहातून कामकाज चालावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. 21 व्या शतकात मुंबईनंतर पुणे हे विकासाचे इंजिन म्हणून काम करणार आहे. पुणे हे आंतरराष्ट्रीय शहर व्हावे, यासाठी विविध विकासाची कामे आपण राबवत आहोत. पुणे मेट्रो, रिंगरोड हे विकासाचे मॉडेल ठरणार आहे. शहरासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ नियोजित असून, पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा आणि मुठा या नदीचे पुनर्जीवन करण्याचे काम हाती घेतले आहे. याशिवाय स्वारगेट येथे ट्रान्सपोर्ट हब नियोजित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे स्मार्ट सिटीचे उद्‌घाटन झाले होते. त्यांच्या स्वप्नातले हे शहर आदर्श, सुंदर आणि देखणे होण्यासाठी राज्यसरकार पाठबळ देणार असल्याचे फडणवीस म्हणाले. विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे. या सभागृहातून चांगले निर्णय व्हावे, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button