‘पाद-या पावट्यां’च्या इशा-यांना अजिबात भीक घालत नाही, दरेकर आणि कदमांवर मनसेची टिका
मुंबई | महाईन्यूज | प्रतिनिधी
“पा’दरे’ पावटेंच्या इशाऱ्यांना आपण अजिबात भीक घालत नाही, आणि त्यांच्या सल्ल्याची राज ठाकरे आणि आम्हांला काडीचीही गरज नाही”, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत प्रवीण दरेकर आणि राम कदम यांच्यावर टिका केली.
काही दिवसांपूर्वी प्रवीण दरेकर आणि राम कदम यांनी मनसे शिवसेनेच्या वाटेवर येत असल्याचे वक्तव्य केले होते. यावरुन मनसेच्या काही नेत्यांनी दरेकर आणि कदम यांच्यावर टीका केली होती. भाजपमध्ये येण्यापूर्वी दरेकर आणि कदम हे दोन्ही नेते मनसे पक्षाचे आमदार होते. पण, कालांतराने या दोन्ही नेत्यांनी मनसेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, त्यांच्या टिकेचा अमेय खोपकर यांनी खरपूस समाचार घेतल आहे. “विचारधारा वगैरे शब्द प्रवीण दरेकरांच्या तोंडी शोभत नाहीत. सत्तेची ऊब ज्यांना सतत हवीहवीशी वाटते आणि त्यासाठी कसल्याही तडजोडी करण्याची तयारी असते त्या दरेकरांनी विचारधारेवर बोलणं हा आजचा सर्वात मोठा विनोद आहे”, अशी टीकाही खोपकर यांनी केली.
“मनसेच्या जीवावर मोठे होऊन ज्यांनी मनसेला ‘रामराम’ ठोकला आणि बेडूकउड्या मारुन दुसऱ्या पक्षाची लाचारी सुरु केली, त्यांनी मनसेला शिकवण्याचा आगाऊपणा करु नये”, असं ट्वीट अमेय खोपकर यांनी केले.