breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पाऊस आणि गारपिटीचीही शक्यता

राज्याच्या हवामानात झपाटय़ाने बदल

राज्याच्या हवामानामध्ये पुढील आठवडाभर मोठय़ा प्रमाणावर बदल होणार असल्याचे चित्र आहे. वायव्य राजस्थानपासून मराठवाडय़ापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पश्चिमी चक्रवात आणि पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमध्ये परस्परविरोधी क्रिया होणार आहे. या सर्व परिस्थितीमुळे राज्यात प्रमुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून, विदर्भात काही ठिकाणी गारपिटीचाही अंदाज आहे. पावसानंतर पुन्हा थंडीत वाढ होणार आहे. दरम्यान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्येही गारपीट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

राज्याच्या सर्वच भागामध्ये सध्या किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे गारठा कमी झाला आहे. बदलत्या हवामानाच्या स्थितीमुळे पावसासाठी पोषक वातावारण निर्माण होत आहे. राज्यात मराठवाडा आणि विदर्भामध्ये २७ जानेवारीपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

२५ जानेवारीपासूनच मराठवाडा, विदर्भातील काही भागात पावसाला सुरुवात होणार आहे. मध्य महाराष्ट्रात पावसाच्या तुरळक सरी, तर विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. २७ जानेवारीनंतर किमान तापमानात पुन्हा घट होऊन गारठा काही प्रमाणात वाढणार आहे. पावसाचा मुक्काम लांबल्यास किमान तापमानामध्ये ३ ते ४ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये २७ आणि २८ जानेवारीला थंडीच्या लाटेची शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसांमध्ये पंजाब, हरियाना, राजस्थान, दिल्ली आदी भागामध्ये पाऊस पडला. काही ठिकाणी गारपीटही झाली. पुढील काही दिवसांत उत्तर कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या भागात २७ जानेवारीला हलक्या पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. गुरुवारी राज्यामध्ये नाशिक येथे राज्यातील नीचांकी ९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कोकण विभागातील काही जिल्ह्यंमध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली. मुंबईत १७.६, तर सांताक्रुझ येथे १५ अंश किमान तापमान नोंदविले गेले. मध्य महाराष्ट्रात पुण्यातील किमान तापमानाचा पारा ११.९ अंशांवर होता. मराठवाडय़ात परभणीमध्ये १० अंश, तर औरंगाबादसह इतर ठिकाणी किमान तापमान १३ ते १४ अंशांवर आले. विदर्भात किमान तापमानाचा पारा १३ ते १७ अंशांपर्यंत नोंदविला जात आहे.

स्थिती कशामुळे?

पश्चिमी चक्रवात आणि पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या परस्परविरोधी स्थितीमुळे सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. उत्तरेकडील राज्यात चांगलाच गारठा आहे. त्या भागातून थंड वाऱ्यांचे प्रवाह राज्याच्या दिशेने येत आहेत. त्याचवेळी बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारेही राज्याच्या दिशेने येत आहेत. या सर्व स्थितीमुळे गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

रब्बी पिके, फळबागांना फटका?

हवामानाच्या बदलत्या स्थितीमुळे जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला पावसासाठी पोषक स्थिती निर्माण होत असते. राज्यात २०१५ मध्ये याच कालावधीमध्ये पावसासह मोठय़ा प्रमाणावर गारपीट झाली होती. त्याचा फटका रब्बी पिके आणि फळबागांना बसला होता. यंदा विदर्भात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या काळात ज्वारी, गहू, हरभरा आदी रब्बी पिके तयार झालेली किंवा काढणीच्या तयारीत असतात. दुसरीकडे द्राक्षांचा मोठा हंगाम याच काळात असतो. अशात गारपीट झाल्यास त्याचा फटका या पिकांना बसू शकतो.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button