पळवून नेवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा जामीन फेटाळला
- विशेष न्यायाधीश आर.व्हि.अदोणे यांचा आदेश
- पीडित मुलगी आहे 13 आठवड्याची गरोदर
पुणे – अल्पवयीन मुलीला पळवून नेवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्याचा जामीन विशेष न्यायाधीश आर.व्ही. अदोणे यांनी फेटाळला. जामीन फेटाळलेल्याचे लग्न झाले असून, त्याला चार मुले आहेत. पीडित मुलगी 13 आठवड्याची गरोदर आहे.
आकाश बाळू तुपसौंदर (वय 24, रा. बिबवेवाडी, मूळ. टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्याने त्या मुलीला 1 फेब्रुवारी रोजी तिच्या कुटुंबियांच्या रखवालीतून टेंभुर्णी येथे पळवून नेले. तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. त्यानंतर तिच्या कुटुबियांनी 5 जून रोजी तिला टेंभूर्णी येथून आकाश याच्या घरातून ताब्यात घेतले. बिबवेवाडी पोलीस स्टेशनला हजर केले. या प्रकरणात पोलिसांनी आकाश याला अटक केली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. वैद्यकीय तपासणीवरून प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचे दिसून येत आहे. ती मुलगी गर्भवती आहे. तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वीही एक बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. जामीन मिळाल्यास तो पीडित मुलीच्या कुटुंबियांवर आणि साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता आहे. तो परगावचा आहे. फरार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे त्याचा जामीन फेटाळावा, असा युक्तीवाद ऍड. बोंबटकर यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने आकाश याचा जामीन फेटाळला.