परदेशात पंचतारांकित हॉटेलला जागा देण्याचे आमिष दाखवून १ कोटी ३० लाखांचा गंडा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/rupee-cheating.jpg)
विदेशात पंचतारांकित हॉटेलला जागा देण्याचे आमिष दाखवून पाच जणांच्या टोळीने अंधेरी डी. एन. नगर परिसरात राहणाऱ्या दर्शन प्रफुल्लचंद्र देसाई यांना तब्बल १ कोटी ३० लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाहीं अटक करण्यात आलेली नाही. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
फिर्यादी दर्शन प्रफुल्लचंद्र देसाई (रा. रुस्तमजी इलिमेंट अपार्टमेंट, डी. एन. नगर, अंधेरी) यांचा जागेत गुंतवणूक करणे आणि ब्रोकिंगचा व्यवसाय आहे. पाच वर्षांपूर्वी देसाई यांची राहुल पुष्करणा उर्फ बॉबी नावाच्या व्यक्तीशी जिममध्ये ओळख झाली. त्याने आपण बॉलिवूडमध्ये लघुपट दिग्दर्शक असून आपल्या ‘लाईफ इज ब्युटिफुल’ या लघुपटाला पारितोषिक मिळाल्याचे सांगितले. त्याचबरोबर मधूर भांडारकर यांच्यासोबत पेज थ्री या चित्रपटाची निर्मितीही केल्याचे सांगितले.
त्यानंतर बॉबीने देसाई यांच्याशी जवळिकता वाढवली. आपले सासरे राजकुमार हे लंडन मध्ये राहात असून तेथील झिब्राल्टर या देशाच्या पंतप्रधानांशी सलोख्याचे संबंध असल्याचे सांगत झिब्राल्टरमधील एक प्लॉट तुम्हाला मिळवून देतो अशी थापही मारली. हॉटेल व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल असेही त्याने देसाई यांना सांगितले. काही महिन्यानंतर बॉबी हा देसाई यांचा भाऊ सुमीतला घेऊन लंडनला गेला. तिथे त्याने राजकुमार नावाच्या व्यक्तीशी ओळख करून दिली. एक जागा दाखवून जागेची किंमत १०० कोटी असल्याचे सांगितले, हा प्लॉट २० कोटीत मिळवून देतो. बँकेचे कर्जही उपलब्ध करून देतो. तत्पूर्वी नोंदणीसाठी एक कोटी आणि वकिलांचे शूल्क म्हणून ३० लाखांची गुंतवणूक करावी लागेल असे सांगितले.
लंडनहून परतल्यावर दर्शन देसाई यांनी भाऊ सुमितशी चर्चा केली आणि नोंदणी शूल्क म्हणून बॉबी व त्याच्या पत्नीच्या खात्यात ६० आणि ७० लाख जमा केले. त्यानंतर बँक खाते झिब्राल्टरमध्ये उघडण्यासाठी आणखी ६० लाखांची मागणी बॉबीने देसाई यांच्याकडे केली. हा प्रकार देसाई यांना संशयास्पद वाटला. त्यांनी झिब्राल्टर देशातील काही लोकांशी फोनवर संवाद साधून संपर्क केला आणि बँकेत चौकशी केल्यानंतर १ कोटी ३० लाख बँकेत जमा झाले नसल्याचे समोर आले.
त्यानंतर या फसवणुकीत समावेश असलेल्या राहूल पुष्करणा उर्फ बॉबी, त्याची पत्नी कविता, राजकुमार, अतुल जोशी आणि ब्रिजमोहन शर्मा या पाच जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ओशिवरा पोलीस अधिक तपास करीत आहेत.