Breaking-newsमहाराष्ट्र
पक्षावर विश्वास ठेवून काम करीत राहू: एकनाथ खडसे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/02/Eknath-Khadse.jpg)
जळगाव: राज्य मंत्रिमंडळात पुनरागमन होणारच नाही, अशी मनातील खदखद माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा परिषदेत व्यक्त केली. प्रदेशाध्यक्षांच्या समोरच उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने खडसे पक्षापासून दुरावत असल्याचे अधोरेखीत झाले आहे. मात्र, कितीही अपमान सहन करावा लागला तरी आपण 40 वर्षे भाजपची सेवा केल्याने पक्ष संघटन वाढीत आपला थोडाफार का होईना खारीचा वाटा आहे. त्यामुळे पक्षावर विश्वास ठेवून काम करीत राहू, असेही खडसेंनी स्पष्ट केले.
जळगाव महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर भाजपने तुकाराम वाडीतील सर्वसामान्यांच्या हस्ते जाहिरनामा प्रकाशित केल्याचे सोपस्कार पार पाडल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते पुन्हा जाहिरनाम्याचे प्रकाशन केले. यावेळी भाजपची रणनिती स्पष्ट करत दानवे यांनी “मिशन प्लस’चा नारा दिला. खडसे यांच्या मंत्रिमंडळाच्या पुनरागमनाच्या प्रश्नावर त्यांनी केवळ योग्य वेळी पुनरागमन होईल, असे उत्तर दिले.
ती योग्य वेळ कधी येणार, असे विचारल्यावर त्यांच्याच शेजारी बसलेले खडसे यांनी अशी वेळ येणारच नाही, असा टोला लगावत प्रदेशाध्यक्षांना निरुत्तर केले. यामुळे गोंधळलेल्या दानवे यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली. त्यानंतर खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
गेली सव्वादोन वर्षे आपण मंत्रिमंडळातून बाहेर आहोत. सर्व प्रकारची चौकशी पूर्ण झाली. परंतु पुन्हा पुन्हा चौकशीच्या नावाखाली आपल्याला मंत्रिपद दूरच, परंतु स्वस्थ झोपूही दिले जात नाही. त्यामुळे आपण प्रचंड अस्वस्थ आहोत.
अनेकदा चौकशा झाल्या, त्यात काहीही तथ्य आढळले नाही. सरकार अजूनही पुढे काही वर्षे आपली चौकशी लांबविण्याची शक्यता असून चौकशी मागून चौकशी करीत आपल्याला मानसिक त्रास दिला जात असल्याचे त्यांनी सूचित केले. आपण इतरांसारखे “क्लिन चिट’ नाहीत, चौकशीवाला माणूस आहे, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही चिमटा काढला.