breaking-newsमहाराष्ट्र

पक्षांतर्गत गटबाजीचा संघर्ष ‘जनसंघर्ष यात्रे’द्वारे संपणार का?

  • उत्तर महाराष्ट्रात गुरुवारपासून काँग्रेसची यात्रा; तीन माजी मुख्यमंत्र्यांचा सहभाग

प्रदेश काँग्रेसतर्फे जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला उत्तर महाराष्ट्रातील फैजपूर येथून ४ ऑक्टोबर रोजी सुरुवात होत आहे. पक्षांतर्गत गटबाजी, हेवेदावे, पाडापाडीचे राजकारण आदींमुळे बिकट अवस्थेत पोहचलेल्या काँग्रेसला उभारी देण्याचे आव्हान पक्षासमोर आहे. ४ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्य़ात संघर्ष यात्रेद्वारे पाळेमुळे घट्ट करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

संघर्ष यात्रेच्या निमित्ताने सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण हे तीन माजी मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्ह्य़ातील फैजपूर येथून यात्रेला सुरुवात होईल. त्या अंतर्गत ठिकठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले आहे. जळगावनंतर जनसंघर्ष यात्रेचा रथ धुळे जिल्ह्यकडे रवाना होईल. पुढे नंदुरबार आणि नाशिकमधून ही यात्रा नगरकडे मार्गस्थ होईल. सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्य़ात एकेकाळी काँग्रेसचे प्राबल्य होते. प्रदीर्घ काळ काही ठराविक कुटुंबाच्या हाती सत्ता एकवटलेली होती. यामुळे पक्षावर त्या कुटुंबांचे वर्चस्व राहिले. सत्ता गेल्यानंतर काहींनी पक्षांतर करत आपला सवतासुभा कायम राखण्याची धडपड केली. उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या सहापैकी एकाही ठिकाणी काँग्रेसचा खासदार नाही. विधानसभेच्या ३५ पैकी केवळ सात मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत.

नाशिकमध्ये पक्षांतर्गत गटबाजीने काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. राष्ट्रवादीच्या दादागिरीचा काँग्रेसला अनेक वर्षे त्रास सहन करावा लागला. त्याची परतफेड जिल्हा परिषदेत काँग्रेसने सेनेशी हातमिळवणी करून केली. महानगरपालिकेतही काँग्रेसचे तोळामासा अस्तित्व आहे. पक्षांतराच्या लाटेत कार्यकर्ते राहिले नाहीत. जे आहेत, ते सारे स्वत:ला नेते मानतात. यामुळेच भाजपच्या राफेल खरेदी कराराविरोधात मोर्चा काढताना कार्यकर्ते जमवताना नेत्यांची दमछाक झाली होती. चार वर्षांत पक्ष विस्तारासाठी कोणी ठोस प्रयत्न केले नाही. गटबाजी जैसे थे राहिली. जिल्ह्य़ाची जबाबदारी सांभाळणारे पदाधिकारी भाजप नेत्यांशी सलगी ठेवतात. या वातावरणात पक्षाला नवचैतन्य कसे मिळणार, हा प्रश्न आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून उत्तर महाराष्ट्राची ख्याती होती. १९३६ मध्ये डिसेंबरमध्ये काँग्रेसचे अखिल भारतीय अधिवेशन जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे झाले होते. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यासह काँग्रेसचे त्या काळातील सर्वच ज्येष्ठ नेते या अधिवेशनास उपस्थित राहिले होते. काँग्रेसने एकेकाळी मधुकरराव चौधरी, प्रतिभा पाटील, के. एम. बापू पाटील, महाजन आणि डी. डी. चव्हाण असे मंत्री जळगाव जिल्हाला दिले आहेत. याच जिल्हाने नंतर देशाला प्रतिभा पाटील यांच्या रूपाने राष्ट्रपती दिला. मधुकर चौधरी यांनी विधानसभा सभापतीपदही भूषविले. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणवणारा जळगाव जिल्हा १९९० नंतर मात्र काँग्रेसच्या हातातून सुटत गेला. आज जळगाव जिल्हा परिषदेत चार, तर पंचायत समित्यांमध्ये केवळ सहा जागा आहेत. नगरपालिका, ग्रामपंचायतींमध्येही नाममात्र संख्याबळ आहे.

धुळे जिल्ह्य़ात माजी मंत्री रोहिदास पाटील आणि माजी मंत्री अमरीश पटेल यांच्यात गटबाजी आणि पक्षांतर्गत हेवेदावे याची किंमत काँग्रेसला मोजावी लागत आहे. पाडापाडीच्या कारणात विरोधी पक्षांचे भले झाले. दोन्ही नेत्यांना काँग्रेसने भरभरून दिले. त्यांच्या शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, प्रकल्पांची संख्या मोठी आहे. या माध्यमातून आपले राजकीय अस्तित्व टिकवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पक्ष म्हणून कोणी विचार करत नाही. नेत्यांमधील गटबाजी संपुष्टात आणण्याची जबाबदारी वरिष्ठांना सांभाळावी लागणार आहे. काँग्रेसचा अभेद्य गड असलेल्या नंदुरबारमध्ये भाजपने गेल्या लोकसभेत जोरदार मुसंडी मारत लोकसभेची जागा काबीज केली. त्या पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुकांमध्ये चारपैकी दोन जागा जिंकत भाजपने आपले पाय रोवण्यास सुरवात केली. स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसची पकड कायम आहे. गांधी कुटुंबीयांस नंदुरबार जिल्ह्य़ाबद्दल कायम जिव्हाळा राहिला आहे. माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या राजकीय जीवनाची सभेद्वारे सुरुवात याच जिल्ह्य़ातून केली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ याच जिल्ह्य़ातून वाढविला गेला. या जिल्ह्य़ाने काँग्रेसला भरभरून दिले. लोकसभा आणि विधानसभेच्या सर्व जागा काबीज करणाऱ्या नंदुरबारमध्ये आता भाजपने आपली ताकद प्रस्थापित केली आहे. भाजपच्या काळात नंदुरबार जिल्हा मंत्रिपदापासून वंचित राहिला. यामुळे विकासाचा मोठा अनुशेष निर्माण झाल्याची भावना आहे. त्याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न काँग्रेसला करावा लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button