निर्भया गँगरेप प्रकरणातील दोषींची फाशी लाईव्ह दाखवणार ?
निर्भया गँगरेप प्रकरणातील आरोपींना फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झालं..22 जानेवारीला त्यांना फाशी देण्यात येणार आहे…मात्र या प्रकरणात एनजीओ ‘परी’ (पीपल अगेंस्ट रेप इन इंडिया)ने माहिती प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहलं आहे. ज्यामध्ये निर्भयाच्या चारही दोषींची फाशी लाइव्ह टेलिकास्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. लेटरमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, ‘देश आणि विदेशातील मीडिया संस्थांना परवानगी देण्यात यावी की, त्यांनी तिहार जेलमध्ये निर्भयाच्या दोषींना फाशीचं लाइव्ह प्रसारण करावं.’
‘निर्भया प्रकरणातील दोषींना 22 जानेवारी 2020 ला फाशी देण्याच्या निर्णयाचा मी आदर करते. मी तुम्हाला विनंती करते की, निर्भयाच्या चारही दोषींना फाशीची शिक्षा देण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचं लाइव्ह टेलिकास्ट करण्यात यावं. यासाठी तुम्ही सर्व नॅशनल आणि इंटरनॅशनल मीडियाला परवानगी द्यावी. हा निर्णय महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत मोठा बदल ठरू शकतो.’, अशी मागणी NGO च्या संस्थापक आणि सोशल एक्टिव्हीस्ट योगिता भयाना यांनी केली आहे. तसेच परि संस्थेच्या मागणीला भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी पाठिंबा दिला आहे.
फाशीची शिक्षा लाइव्ह करावी यावर बोलताना वकील आसिम सरोदे म्हणाले की, फाशीच्या शिक्षेचं लाइव्ह करण्यात यावं ही मागणी बालिश असण्यासोबतच बेकायदेशीर आहे. माहिती प्रसारण मंत्रालयाकडे ही मागणी केलेली आहे, त्यामुळे मंत्रालयाने त्यांना त्वरित समजावून सांगणं गरजेचं आहे. शिक्षा हा प्रदर्शन करण्याचा मुद्दा नाही. त्यामुळे शिक्षेचं लाइव्ह करणं हे समाजातील बिघडलेल्या मानसिकतेचं लक्षणं आहे.