नरेंद्र मोदींनी केली आचारसंहिता भंग ? निवडणूक आयोगाने मागवला अहवाल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/pm-11_201903207616.jpg)
नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर देशात निवडणूक प्रचाराने जोर धरलाय, निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आचारसंहिता भंग केल्याच्या अनेक तक्रारींचा भडीमार सध्या निवडणूक आयोगाला सहन करावा लागत आहे. शुक्रवारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली.
पूर्व केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. आचारसंहिता लागू असतानाही अनेक पॅट्रोलपंप, एअरपोर्ट याठिकाणी नरेंद्र मोदी यांचे पोस्टर्स लागल्याची तक्रार केली, त्याचसोबत राहुल गांधी यांच्याबद्दल भाजप नेत्यांकडून अश्लील टीका करण्यात येते, निवडणूक प्रचारात सैन्याचा वापर करण्यावर बंदी आणावी या 3 मुद्द्यांवर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
आज रात्रीपर्यंत देशभरातील पॅट्रोल पंपावर, एअरपोर्टवर नरेंद्र मोदी यांचे किती पोस्टर्स लावण्यात आलेत, पोस्टर्स हटविण्यासाठी यंत्रणा सुरु आहे का याबाबत सविस्तर अहवाल मागवू तसेच राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या अश्लिल टीकाटीप्पणीवर रेकॉर्ड मागवण्यात येत आहे असं आश्वासन केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिलं. निवडणूक प्रचारामध्ये सैन्याचा वापर करु नये असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने याआधीच देण्यात आल्याचे सांगितले.