नगरमध्ये भरदिवसा उद्योगपतीचं अपहरण, रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पळवलं
नगर:- नगरमध्ये आज एका उद्योगपतीच्या अपहरणाच्या घटनेनं खळबळ उडालीय. भरदिवसा त्यांच्या राहत्या घरून अपहरण करण्यात आल्याने नगर पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. करीमभाई हुंडेकरी असं त्या उद्योगपतींचं नाव असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेनं व्यापारी वर्गात खळबळ उडालीय. नगरमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने गेली काही वर्ष कायम टीका केली जात होती. आता या अपहरणाच्या घटनेमुळे पोलिसांना आपली कार्यक्षमता सिद्ध करावी लागणार आहे. करीमभाई हुंडेकरी यांचा नगरमध्ये चांगला व्यवसाय आहे. ते सकाळी नेहमीप्रमाणं सकाळी आपल्या घराबाहेर असताना ही घटना घडली. त्याचवेळी चार ते पाच जणांची एक टोळी त्यांच्या घराजवळ आली आणि त्यांनी हुंडेकरी यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून कारमध्ये पळवून नेलं त्यांचं अपहरण का झालं याचा शोध सुरू आहे.
- चार तासानंतर सापडले उद्योगपती
अपहरण झालेले प्रसिद्ध उद्योजक करीमभाई हुंडेकरी पोलिसांना जालन्यात सापडले, अपहरणकर्त्यांनी हुंडेकरी यांना नगरमधून पळवून जालन्यात सोडून दिलं. या प्रकरणामागे नेमकं काय आहे याचा छडा आता पोलीस लावत आहेत.