धक्कादायक! पुराच्या पाण्यात सूर मारला, ग्रामस्थ व्हिडीओ काढत बसले, युवक वाहून गेला!
![Twenty migrants die after boat capsizes off Tunisian coast](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/water-death-drowning.jpg)
रायगड: नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात उडी मारण्याचे साहस युवकाच्या अंगलट आले आहे. रायगडमध्ये जानसई नदीत उडी मारणारा 23 वर्षीय युवक पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. दक्षिण रायगड भागातील सर्व प्रमुख नद्यांना पूर आला आहे. म्हसळा शहरातून पाभरे भागात जाणाऱ्या मार्गावर जानसई नदीच्या पुलावर अनेक ग्रामस्थ नदीच्या पुराचा अंदाज घेत होते. पूर आलेल्या नदीमध्ये पोहण्याचे प्रात्यक्षिक दाखवत उपस्थितांचे मनोरंजन करण्याची लहर काही युवकांना आलेली होती.
जानसई नदी धोक्याच्या पातळीवर असूनही चार-पाच तरुणांनी पुलावरुन उड्या मारल्या. नदीत उड्या मारुन काही जणांनी लागलीच नदीचे तीर गाठले, मात्र 23 वर्षांच्या बदर अब्दल्ला हळदे या युवकाला नदीचा काठ गाठणे अशक्य झाले होते. नदीच्या मध्यभागी असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहातून तिरावर येण्याचा बराच प्रयत्न बदर करत होता. मात्र वाहत्या प्रवाहातून किनारा गाठणे त्याला अशक्य झाले आहे. अखेर पुलावर जमलेल्या ग्रामस्थांसमोरच बदर वाहून जाऊ लागला.
बदर प्रवाहाच्या मध्यभागी दिसेनासा झाल्यावर ग्रामस्थांची तारांबळ उडाली आहे. परंतु पूर आलेल्या नदीच्या पाण्यात उडी मारण्याचे धाडस कोणाला झालेले नाही. पाण्यात उडी मारण्याआधी त्याने आपल्या चपलाही पुलावर काढून ठेवल्या होत्या. ग्रामस्थांनी तातडीने म्हसळा पोलिसांना याची माहिती दिली आहे. पोलिसांनी ग्रामस्थांच्या साथीने शोधकार्य हाती घेतले, परंतु दिवसअखेरपर्यंत बदरचा शोध लागलेला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर संकटच कोसळले आहे.