धक्कादायक! कुलर सुरु करताना शॉक, एकमेकींना वाचवताना तीन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/2020_3image_15_51_478747655340-ll.jpg)
यवतमाळ: कुलरचा शॉक लागून तीन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. एकमेकींना वाचवताना सहा वर्षांखालील तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झालेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात श्रीरामपूरमध्ये (कोदुरली) ही घटना घडली आहे. सहा वर्षांची रिया भुसेवार, चार वर्षांची मोनिका भुसेवार आणि दोन वर्षांची मोंटी भुसेवार दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडल्या आहेत. भुसेवार कुटुंबाच्या राहत्या घरी आज (गुरुवारी) सकाळी ही घटना घडली आहे.
घरात तिन्ही मुली जेवत बसल्या होत्या. त्यावेळी मोठी बहीण कुलर सुरु करण्यास गेली होती. मात्र विजेचा जोरदार धक्का बसल्याने ती तिथेच चिकटली. ताईला काढण्यासाठी दुसरी बहीण गेली असता तिलाही विजेचा जोरदार धक्का बसला आहे. त्यानंतर तिसरी मुलगीही आपल्या बहिणींना काढायला गेली, तेव्हा तिलाही जोरदार करंट लागला आहे. यामध्ये तिन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झाला आहे.