धक्कादायक! आजारी वडिलांना भेटण्यासाठी आलेल्या मुलीचा अंगावर वीज पडून मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/download.jpeg)
वडिलांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना भेटायला आलेल्या मुलीचा घराशेजारीच असलेल्या शेतांमध्ये वीज पडून मृत्यू झाला आहे. भद्रावती तालुक्यातील विसापूर (मासळ) येथे बुधवारी (दि.१०) संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अर्चना संजय चेन्दे (वय ३४, रा. एकर्जूना) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
ती आपल्या वडिलांची प्रकृती ठीक नसल्यामुळे भद्रावती तालुक्यातील विसापूर (मासळ) येथे भेटायला आली होती. वडिलांची भेट घेऊन ११ जुलै रोजी सकाळी तिला गावाला परत जायचे होते. दरम्यान, काही वेळ मोकळा असल्याने ती घराशेजारील शेतामध्ये भाजीपाला तोडण्यासाठी गेली. मात्र, यावेळी अचानक झालेल्या पावसात वीज पडून तिचा जागीच मृत्यू झाला. मात्र, आश्चर्य म्हणजे जवळच असलेल्या इतर कोणालाही इजा पोहचली नाही.
या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.