देवेंद्र फडणवीसांनी केला कोरोनायोध्यांचा अपमान, डॉक्टर-नर्स-आरोग्य कर्मचा-यांनी केला निषेध
भुसावळ – महाराष्ट्रापुढे कोरोनाचे महाभयानक संकट उभे ठाकले असताना भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगावमध्ये उल्हासराव पाटील वैद्यकीय महाविद्यालयाबद्दल केलेल्या विधानामुळे डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांचा निषेध केला आहे. तसंच, कामबंद करण्याचा इशाराही दिला.
शनिवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोदावरी हॉस्पिटलमध्ये रुग्णाची गैर सोय होते. सेवा शुश्रूषा व्यवस्थित होत नसल्याचा तथ्यहीन आरोप केला. या आरोपाचा गोदावरीच्या डॉ. उल्हास पाटील मेडिकल महाविद्यालयातील परिचारिकांनी तीव्र निषेध केला असून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत केलेल्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाशी संबंधित निराधार आरोप राजकीय नेत्यांकडून केले जात आहे. प्रत्यक्षात कुठलीही वस्तुस्थिती जाणून न घेता वारंवार डॉ. उल्हास पाटील रूग्णालयावर रुग्णांची गैरसोय होत असल्याचा आरोप केला जात आहे.
फडणवीसांच्या विधानामुळे डॉक्टरांचे खच्चीकरण
‘गेल्या दोन महिन्यांपासून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील डॉक्टर, परिचारीका, मेडीकल स्टोअर्स, वॉर्डबॉय, सफाई कामगार असे अनेक जण स्वत:च्या घरापासून लांब राहुन रात्रंदिवस रूग्णसेवेसाठी राबत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न काही तथाकथित राजकीय नेत्यांकडून केला जात आहे’ असं स्पष्ट मत रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
…अन्यथा कामबंद आंदोलन पुकारणार
स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी आरोप करून रूग्णसेवेत नेत्यांकडून अडथळे आणले जात आहे. तरी राजकीय नेत्यांनी वस्तुस्थिती जाणून न घेता निराधार आरोप केल्यास रूग्णालयातील सर्व कर्मचारी, परिचारिका हे कामबंद आंदोलन पुकारतील, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी कुठलीही माहिती न घेता आरोप केले आहेत. त्यांच्या वक्तव्याचाही परिचारिकांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.